दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका ४२ वर्षीय बिझनेसमॅनने पत्नी आणि सासूची हत्या केली. त्यानंतर स्वत:चे जीवन संपवले. महत्वाचं म्हणजे त्याने एकाचवेळी दोन हत्या केल्या नाहीत. आधी त्याने बंगळुरुमध्ये पत्नीची हत्या केली. त्यानंतर विमानाने तो कोलकात्याला परतला. येथे आल्यानंतर त्याने सासूवर गोळया झाडल्या.

सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली. अमित अग्रवाल आणि त्यांची पत्नी शिल्पी यांचे मागच्या दोन वर्षांपासून कोर्टात घटस्फोटाचे प्रकरण सुरु होते. या जोडप्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तो सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोलकाता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अमित अग्रवाल फुलबागन भागातील आपल्या सासऱ्यांच्या घरी गेले. तिथे त्यांचा सासरे सुभाष धानदानिया यांच्याबरोबर वाद सुरु झाला. जेव्हा त्यांची सासू ललिता यांनी हस्तक्षेप करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अमित अग्रवाल यांनी त्यांच्याजवळचे पिस्तुल काढले व गोळी झाडली.

या प्रकाराने हादरलेले सुभाष धानदानिया लगेच घराबाहेर पळाले व त्यांनी बाहेरुन दरवाजा बंद केला. शेजाऱ्यांकडे त्यांनी मदत मागितली व पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला, तेव्हा अमित अग्रवाल हे रक्ताच्या थारोळयात पडलेले होते. जमिनीवर बंदूक पडलेली होती.

अमितने पत्नीची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच बंगळुरु पोलिसांना सर्तक केले. बंगळुरु पोलिसांना घरामध्येच शिल्पीचा मृतदेह सापडला. बंगळुरुला जाऊन पत्नीची हत्या केल्यानंतर अमित  विमानाने कोलकात्याला परतला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.