पत्नी तिच्या प्रियकरासह मिळून हत्येचा माझ्या कट रचते आहे हे सांगत एका माणसाने थेट पोलीस ठाणं गाठलं आहे. त्याने हा आरोप केला आहे की त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर हे दोघंही त्याला ठार करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांना त्याने Whats App आणि इन्स्टाग्रामवरचे या दोघांचे चॅट्स दाखवले आहेत. आपला मृत्यू हा रस्ते अपघात वाटावा अशी योजना हे दोघंही आखत आहेत असा आरोप या माणसाने केला आहे. ही घटना तेलंगणातल्या मेहबुबाबाद जिल्ह्यातील आहे. राजेश्वर राव असं तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
राजेश्वर रावने पोलिसांना पत्नी बाबत काय सांगितलं?
राजेश्वर रावने दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा आणि त्याची पत्नी भवानीचा विवाह २०१६ मध्ये झाला. या दोघांना दोन मुलीही आहेत. काही कालावधी चांगला गेला त्यानंतर भवानीची ओळख एका कुरियर बॉयचं काम करणाऱ्या सैदूलू याच्याशी झाली. राजेश्वरच्या म्हणण्यानुसार तो घरी नसताना सैदूलू दोन-तीनदा त्याच्या घरी कुरिअर घेऊन आला होता. त्यावेळी या दोघांची ओळख झाली. पण त्यांच्यात काही अफेअर किंवा प्रेमसंबंध असतील असं वाटलं नव्हतं. २७ जुलैच्या दिवशी राजेश्वरने त्याच्या पत्नीचा म्हणजेच भवानीचा फोन तपासला, त्यावेळी त्याला कळलं की भवानी आणि सैदूलू हे दोघंही मिळून त्याच्या हत्येचा कट रचत आहेत. याला मार्गातून दूर करुया वगैरे संवाद त्यात आहेत, असं राजेश्वरने पोलिसांना सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
राजेश्वरने जे पुरावे दिलेत त्याची पोलिसांनी नोंद घेतली आहे
राजेश्वरने त्याच्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की भवानी तिच्या प्रियकराला म्हणाली मी राजेश्वरला घरात ठार करु सकत नाही. कारण त्यामुळे माझ्यावरच संशय येईल, तो रस्ते अपघातात मेला आहे असं आपण भासवू शकतो का? यावर सैदूलू म्हणाला की मला त्याला कसं मारता येईल. मी पण त्याला मारु शकत नाही. दुसऱ्या एका चॅटमध्ये भवानी सैदूलूला म्हणते आहे की तू त्याला ठार करणार नसशील तर ठीक आहे मी पाहते त्याला कसं मारायचं. राजेश्वर रावने हे स्क्रीन शॉट पोलिसांकडे सोपवले आहेत आणि आपला जीव धोक्यात आहे असं पोलिसांना सांगितलं आहे. एवढंच नाही तर आपल्यासह आपल्या दोन मुलींचाही जीव धोक्यात आहे असंही त्याने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी पोलीस आता पुरावे तपासत आहेत त्यांनी राजेश्वरच्या सांगण्यावरुन या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
राजेश्वर रावने जी तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी जे डिजिटल पुरावे समोर आले आहेत त्याची सत्यता तपासून आम्ही या प्रकरणात पुढील तपास करत आहोत. भवानी आणि सैदूलू हे दोघंही सध्या फरार आहेत अशीही माहिती पोलीस अधिकारी एम राजू यांनी दिली.
