पार्टीत जास्त चिकन पिस खाल्ल्याच्या रागातून एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना कर्नाटकातल्या बेळगाव मध्ये घडली आहे. मुद्दलगई तालुक्यातल्या एका गावात ही घटना घडली. उत्तर प्रदेशातून इथे आलेला एकाने त्याच्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. चिकन पिस खाण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच एका मित्राने दुसऱ्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केलं अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकी काय घटना घडली?
उत्तर प्रदेशातील पिलभीत जिल्ह्यातल्या कबीरगंज गावातून सीताराम हा कर्नाटकमधल्या बेळगावमध्ये त्याच्या मित्राकडे आला होता. मुदलगई या ठिकाणी तो प्रिय स्टिल कंपनीमध्ये काम करत होता. अरुण कुमार हा त्याचा मित्र होता आणि दोघंही एकमेकांच्या घरीही जात होते. या दोघांनी पार्टी करायचं ठरवलं. अरुण आणि सीताराम यांनी चिकनची पार्टी केली. त्यावेळी अरुण आणि सीताराम यांच्यात चिकन पिस खाण्यावरुन वाद झाला. अरुण म्हणाला की तू माझ्यापेक्षा जास्त चिकन पिस खाल्ले आहेस, मला तुझा राग आला आहे. असं म्हणत अरुणने सीतारामशी वाद घातला. त्यानंतर या वादाचं रुपांतर भांडणात झालं. त्यानंतर अरुणने रागाच्या भरात सीतारामवर चाकू हल्ला केला. त्यातच सीतारामचा मृत्यू झाला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
अरुण कुमार सीतारामला घेऊन गेला होता रुग्णालयात
अरुण कुमारने हल्ला केल्यानंतर तो भानावर आला. त्यानंतर त्याने तातडीने सीतारामला रुग्णालयात नेलं. गोकाक सरकारी रुग्णालयात अरुण कुमार सीतारामला घेऊन गेला. त्याने सांगितलं की सीताराम इमारतीवरुन पडला आणि त्याचा अपघात झाला. पण अरुण जे सांगत होता त्यावर डॉक्टरांना विश्वास बसला नाही. हा अपघात नाही तर हल्ला आहे हे डॉक्टरांना लक्षात आलं. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी अरुण कुमारला ताब्यात घेतलं. त्यानंतर अरुण कुमारने हे मान्य केलं की त्यानेच सीतारामची हत्या केली. सीतारामवर उपचार सुरु करण्यात आले होते. पण त्याला जखमा बऱ्याच झाल्या होत्या त्यामुळे तो वाचू शकला नाही. पोलिसांनी अरुण कुमारला सीतारामच्या हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली.
