दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर या ठिकाणीही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीवर हॉटेलमध्ये नेऊन आणि धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. ज्या नराधमाने या मुलीवर बलात्कार केला त्याची आणि या मुलीची ओळख स्नॅपचॅटवर झाली होती. त्याने तिला हॉटेलवर नेलं, त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला.

घटनेबाबत पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

१२ वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला असा आरोप आहे. या मुलीची आणि त्या पुरुषाची ओळख स्नॅपचॅटवर झाली होती. कृष्णा असं या पुरुषाचं नाव आहे. कृष्णा आणि या मुलीची ओळख स्नॅपचॅटवर झाली होती. हे दोघंही एकमेकांना वर्षभरापासून ओळखत होते. एकमेकांशी मेसेज करून ते संपर्कात होते. या मुलीने सांगितल्यानुसार २२ सप्टेंबरला कृष्णाने तिला फोन केला आणि भेटायला बोलवलं. या मुलीने घरी सांगितलं की तिला कोचिंग क्लास आहे. संध्याकाळी ५.१५ च्या दरम्यान ती घराबाहेर पडली. मात्र क्लासला न जाता ती कृष्णाला भेटायला गेली. तो तिला हॉटेलवर घेऊन गेला. या मुलीने त्याला विरोध दर्शवला. त्यावेळी त्याने मी तुझ्या वडिलांना इजा पोहचवेन आणि तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. तसंच त्यानंतर या मुलीवर कृ्ष्णा नावाच्या त्या तरूणाने हॉटेलवर घेऊन जात बलात्कार केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मुलीने घरी आल्यानंतर सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगितला

पीडित मुलगी बलात्काराच्या घटनेनंतर घरी आली. तिने तिच्या घरातल्यांना घडलेला प्रकार सांगितला. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने कुटुंब तिला पोलीस ठाण्यात आणण्यास तयार नव्हतं. पण नंतर म्हणजेच २४ सप्टेंबरला त्यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आणि कृष्णा या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. सदर मुलगी अल्पवयीन आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर कृष्णा फरार झाला आहे. आता पोलीस हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्यांनी या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत. तसंच सदर मुलीचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर स्नॅपचॅटवर या दोघांचा काय संवाद झाला होता? हॉटेलच्या आसपास कृष्णा आधीही गेला होता का? याबाबतही पोलीस शोध घेत आहेत. तसंच त्याचा सोशल मीडियाही तपासण्यात येतो आहे.