Consumer Court Fine Hyderabad customer for Carry bag refund: मॉल आणि मोठ्या डिपार्टमेंटल दुकानांमध्ये हजारो रुपयांची खरेदी केल्यानंतरही कॅरी बॅगेसाठी पैसे आकारले जातात. अनेक ग्राहकांना ही बाब खटकते, मात्र आता हे सवयीचे झाल्यामुळे ग्राहकही त्यासाठी तयार असतात. मात्र हैदराबादमधील एका ग्राहकाने खरेदीनंतर कॅरी बॅगेसाठी १० रुपये आकारल्याबद्दल आवाज उचलला. त्यानंतर त्याने ४ कोटींची नुकसान भरपाई ग्राहक मंचाच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. पण सुनावणीनंतर ग्राहकालाच उलट १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हे प्रकरण नेमके काय आहे? हे पाहू.

द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, हैदराबाद ग्राहक विवाद निवारण आयोगाला सुनावणीदरम्यान कळले की, तक्रार दाखल करणारा ग्राहक हा नेहमीच अशा प्रकारच्या तक्रार दाखल करत असून कोणत्याही पुराव्याशिवाय त्याने अनेक व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे आयोगाने सदर ग्राहकाची तक्रार खोटी, क्षुल्लक आणि त्रासदायक असल्याचे सांगून त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या निर्णयानुसार, तक्रारदार ग्राहकाने संबंधित विक्रेत्याला ५ हजार रुपये आणि उर्वरित ५ हजार रुपये ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.

१० रुपयांचा वाद ४ कोटींवर कसा गेला?

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार ग्राहकाने सदर विक्रेत्याच्या दुकानातून १० मार्च २०२५ रोजी १,६०९ रुपयांचे कपडे खरेदी केले होते. त्यानंतर कॅरी बॅगेसाठी १० रुपये आकारण्यात आले. सदर शुल्काला ग्राहकाने आव्हान दिले होते. सदर शुल्काची माहिती बिलात दिली गेलेली नाही, तसेच कॅरी बॅगेसाठी ग्राहकाकडून जादा पैसे घेणे, हे अनुचित व्यापार पद्धतीचे लक्षण आहे, असा युक्तिवाद तक्रारदाराने केला.

हा ग्राहक केवळ १० रुपयांच्या शुल्कापर्यंत मर्यादीत राहिला नाही. तर त्याने आरोप केला की, सदर विक्रेत्याकडून ग्राहकांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे विक्रेत्याने ग्राहक मंचाच्या खात्यात ४ कोटी रुपये जमा करावेत, अशी मागणी त्याने केली.

विक्रेत्याने काय युक्तिवाद केला?

विक्रेत्याने दावा केला की, कॅरी बॅग घेणे किंवा न घेणे हे पूर्णतः ग्राहकावर अवलंबून आहे. कॅरी बॅग ऐच्छिक होती. विक्रेत्याने पुढे म्हटले की, सदर ग्राहकाने कॅरी बॅग घेण्याचा पर्याय स्वीकारला आणि त्याचे पैसेही दिले. तसेच दुकानात ठिकठिकाणी कॅरी बॅगेसाठी पैसे आकारले जातील, याबाबत माहिती दिली आहे. तसेच तक्रारदार ग्राहकाने दाखल केलेला दावा प्रामाणिक हेतूने केलेला नसून पैसे उकळण्यासाठी त्याने अशाच प्रकारचा दावा वारंवार दाखल केलेला आहे.

ग्राहक मंचाने या दाव्याची खातरजमा केली असता ग्राहकाने अनेक विक्रेत्यांविरोधात वेगवेगळे दावे दाखल केल्याचे आढळून आले. यानंतर ग्राहक मंचाने खोटी आणि निरर्थक तक्रार केल्याबद्दल ग्राहकावर दंडात्मक कारवाई केली. ज्यात त्याला १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.