एका भटक्या कुत्र्याने मुलाला चावा घेतल्यानंतर एका व्यक्तीने कुत्र्यांची अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिमरियातल गावात ही घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली होती. या क्रूर हत्येचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एका प्राणी कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे देहाट पोलीस स्टेशनचे प्रभारी आनंद कुमार यांनी सांगितले.

दुरून चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, माणूस कुत्र्याला मारताना आणि धारदार शस्त्राने त्याचे पाय कापताना दिसतोय. तसेच कुत्रा वेदनांनी ओरडताना दिसत आहे. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्सच्या (पेटा) कार्यकर्त्याने ग्वाल्हेर पोलिसांकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलीस अधीक्षक अमित सांघी यांनी पीटीआयला सांगितले.

“गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सागर विश्वासने कुत्र्याने त्याच्या मुलावर हल्ला केल्याने संतापला होता. कुत्र्याने गावातील इतर पाच लोकांनाही चावा घेतला होता. दरम्यान, आरोपींला न्यायालयात हजर राहण्यासाठी लवकरच नोटीस बजावली जाईल, असे सांघी म्हणाले.

एनजीओ पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्या छाया तोमर यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पेटा कार्यकर्ते मीत आशर आणि पीएफएचे प्रियांशू जैन यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. दरम्यान, पेटाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय. त्यात म्हटलंय की, “एका माणसाने कुत्र्याला रॉडने वारंवार मारहाण करून आणि नंतर चाकूने त्याचा पाय कापून टाकला. ही घटना दुर्दैवी आहे.”  

“आरोपींना मानसिक मूल्यमापन आणि समुपदेशनाची गरज आहे. अशा प्रकारची प्रकरणे प्राण्यांच्या अत्याचाराविरुद्ध मजबूत कायद्यांची गरज दर्शवतात,” असं पेटा कार्यकर्ते जैन म्हणाले.