एखाद्या घरात तरुण मुलाचं निधन होणं ही बाब अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायी असते. सगळ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. असाच एक प्रकार पंजाबच्या कपुरथला या ठिकाणी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या बाबतीत झाला पण १५ दिवसांनी जे घडलं ते ऐकून कुटुंब गोंधळून गेलं. आपल्या घरातला बेपत्ता झालेला मुलगा मृत झाला असं समजून एका मृतदेहावर या कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. पण १५ दिवसांनी एक फोन आला आणि या कुटुंबाला कळलं की त्यांच्या घरातला तो तरुण मुलगा जिवंत आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार पंजाबच्या कपुरथला या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबातला एक मुलगा बेपत्ता झाला होता. रवी कुमार असं या मुलाचं नाव होतं. तो ५ ऑगस्टला घरातून बाहेर पडला आणि परतलाच नाही. त्याच्या वडिलांनी आणि भावाने त्याचा शोध घेतला पण तो तरुण सापडला नाही. शेवटी कुटुंबाने ११ ऑगस्ट रोजी रवी बेपत्ता झाल्याची तक्रार कपुरथला पोलीस ठाण्यात नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी रवीचा शोध सुरु केला. या दरम्यान पोलिसांना अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रवीच्या कुटुंबाला बोलवण्यात आलं. रवीच्या कुटुंबाने ओळख पटवली आणि सदर व्यक्ती रवीच आहे असं पोलिसांना सांगितलं. त्यांना वाटलं की आपल्या घरातून बेपत्ता झालेला रवी याचाच तो मृतदेह आहे. १३ ऑगस्टला रवी च्या कुटुंबाने मृतदेहावर रवीचा मृतदेह समजूनच अंत्यसंस्कार केले. या घटनेचा १५ दिवस लोटले आणि मग तुरुंगातून त्यांना फोन आला. ज्यात सांगण्यात आलं की रवी जिवंत आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
२ सप्टेंबरला नेमकं काय घडलं?
आपल्या घरातला मुलगा गेला असं समजून त्या दुःखात रवीचं कुटुंब होतं. मात्र २ सप्टेंबरला या कुटुंबाला तुरुंग प्रशासनाकडून एक फोन आला. त्यांनी सांगितलं की रवी कुमार हा जिवंत आहे आणि तो कपुरथला तुरुंगात आहे. रवी कुमार घरातून बाहेर पडला तेव्हा असाच रिकामपणा करत फिरत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची रवानगी कपुरथला येथील कारागृहात करण्यात आली. हा फोन आल्यानंतर रवीचं कुटुंब दुसऱ्या दिवशी तुरुंगात गेले. रवी जिवंत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. सुरुवातीला हे लोक असा फोन आल्याने गोंधळून गेले होते. पण रवीला जेव्हा त्यांनी जिवंत पाहिलं तेव्हा ते खूपच समाधानी झाले.
