मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या लसीकरणाच्या बदल्यात करण्यात आलेल्या अजब मागणीमुळे वेद्यकीय अधिकारीही चक्रावून गेले आहेत. लस घेण्यासाठी उस्तुक नसलेल्या या व्यक्तीने जेव्हा पंतप्रधान मोदी उपस्थित असतील तेव्हाच करोना लसीचा पहिला डोस घेईल असे म्हटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी ते पुन्हा एकदा त्या व्यक्तीचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील असे म्हटले आहे.

धार जिल्ह्यातील दही ब्लॉकमधील रिसोर्स कोऑर्डिनेटर मनोज दुबे यांनी सांगितले की, लसीकरण करणारे पथक किकरवास नावाच्या आदिवासी गावात पोहोचले तेव्हा ही बाब उघडकीस आली. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १३० किमी अंतरावर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सरकारी पथक एका गावकऱ्याचे लस घेण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीला विचारले जाते की कोणाला कॉल करावा जेणेकरून तो लस घेईल. ही व्यक्ती प्रथम म्हणते की वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावले पाहिजे.

 यानंतर, जेव्हा उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले जावे का, असे विचारले, तेव्हा ती व्यक्ती म्हणते की जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींना फोन करण्यास सांगा. संपूर्ण गावात फक्त दोनच लोकांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. एक हा माणूस आणि दुसरी त्याची पत्नी. आम्ही पुन्हा त्या व्यक्तीकडे जाऊ आणि लसीकरण करण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटल आहे.

मध्यप्रदेश सरकारतर्फे गावोगावी लसीकरणासाठी तयार करण्यासाठी आरोग्यविभागाची पथके घरोघरी पाठवण्यात येत  आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मेगा लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती.