उत्तर प्रदेशातील बिजनौर भागात २३ वर्षीय व्यक्तीचा त्याच्याच भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मनजित सिंह असं या तरुणाचं नाव असून तो काही दिवसांपूर्वी दिल्लीवरुन बिजनौरमधील मलकपूर या आपल्या गावी आला होता. गावी आल्यानंतर करोनाची चाचणी करुन घे असं मनजितची भावंड त्याला सांगत होती, ज्याला त्याने नकार दिला. यावरुन झालेल्या वादात मनजितच्या चुलत भावडांनी त्याला मारहाण केली, ज्यात तो जखमी झाला. अखेरीस मीरत येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मनजितने आपला अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर मनजितचे वडील कल्याण सिंह यांनी कपिल आणि मनोज या दोन भावांविरोधात, त्यांची आई पुनिया आणि मनोजची पत्नी डॉली यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बिजनौरचे अतिरीक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजित आणि त्याच्यासोबतचे काही कामगार दिल्लीवरुन १९ मे ला बिजनौरला पोहचले. यावेळी त्यांची थर्मल स्क्रिनींगद्वारे चाचणी घेण्यात आली. यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे त्यांची पुढील चाचणी घेण्यात आली नाही. मात्र घरी परतल्यानंतर मनजितचे भाऊ कपिल आणि मनोज त्याला वारंवार, करोनाची चाचणी करुन घे अशी मागणी करत होते. गुरुवारी मनजित आणि त्याच्या भावंडांमध्ये चाचणी करुन घेण्यावरुन पुन्हा एकदा वाद झाला. या वादात मनजितने आपल्या भावांवर आजीची काळजी व्यवस्थित न घेतल्याचा आरोप केला.

यामुळे संतापलेल्या कपिल आणि मनोज यांनी काठ्यांनी मनजितला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मनजितचा खांदा आणि डोक्याला दुखापत झाली. या मारहाणीत तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही.