बोगस डॉक्टरने उपचार केल्याने ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २३ सप्टेंबर रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील टीएमएच रुग्णालयात ही घटना घडली. अबू अब्राहम लूक असं या आरोपी डॉक्टरचं नाव आहे, तर विनोद कुमार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार केली असून आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २३ सप्टेंबर रोजी विनोद कुमार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कोझिकोड जिल्ह्यातील टीएमएच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी या रुग्णालयातील निवासी डॉक्टर पदावर कार्यरत असलेल्या अबू अब्राहम लूक याने त्यांच्यावर उपचार केले. मात्र, ५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
Brave Woman Video Viral: तीन चोरांना ‘ती’ एकटी भिडली; महिलेच्या धाडसाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा –
या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी अन्य एका डॉक्टरला रुग्णाचे वैद्यकीय अहवाल दाखवले. त्यावेळी अबू अब्राहम लूकने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरबाबत याबाबत माहिती घेतली असता, आरोपी डॉक्टरकडे एमबीबीएसची पदवीच नाही असं त्यांना समजलं. तसेच तो २०११ पासून तो एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असून त्याने एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची परीक्षाही उत्तीर्ण केली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर मृतकाच्या कुटुंबियांनी थेट पोलिसांत धाव घेत आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, मृत कुटुंबियांच्या नातेवाईकाच्या तक्रारीनंतर आम्ही आरोपी डॉक्टरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच भारतीय वैद्यकीय परिषद कायद्याच्या कलम १२ (२) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीजीत टीएस यांनी दिली. तसेच आरोपीला अटक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.