एअर हॉस्टेससोबत जबरदस्तीने काढलेला सेल्फी पडला महागात

तिच्या खांद्याला पडकून त्याने जबरदस्तीने सेल्फी काढला.

संग्रहित छायाचित्र

जेट एअरवेजच्या एअर हॉस्टेससोबत गैरवर्तन आणि तिच्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. गुजरातस्थित मोहम्मद अबुबकर नावाच्या या व्यक्तीने विमानातील प्रसाधनगृहात धुम्रपान करून नियमांचे उल्लंघनदेखील केले. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच अबुबकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. विमानातील प्रवाशांना काय हवे-नको हे पाहण्यासाठी आपण फिरत असताना अबुबकरने आपला हात पकडला आणि एक सेल्फी काढू असे म्हणाला. सतत विरोध करूनदेखील प्रवासादरम्यान तो आपल्याशी गैरवर्तन करत राहिल्याचे एअर हॉस्टेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
अबुबकरने एअर हॉस्टेसला त्रास देणे चालूच ठेवले आणि जबरदस्तीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या खांद्याला पडकून त्याने जबरदस्तीने सेल्फी काढला. यानंतर एअर हॉस्टेसने आरडाओरड केल्याने तेथे विमानातील अन्य कर्मचारी जमा झाले. त्यांना पाहून अबुबकर विमानातील प्रसाधनगृहात शिरला आणि तेथे त्याने धुम्रपान केले.
अबुबकरविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचबरोबर तो विमानात सिगारेट लायटर घेऊन कसा चढला याचादेखील पोलीस तपास करत आहेत. अबुबकरचा फोन जप्त करून फॉरेन्सिक पडताळणीसाठी पाठविण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man forces jet airways air hostess for selfie police arrested at chhatrapati shivaji international airport