Sambhal Violence Updates : उत्तर प्रदेशातील संभल येथे 24 नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले होते. यानंतर देशभरात वातावरण तापलेले आहे. अशात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने संभलमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले म्हणून, तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आहे.
मुरादाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतपाल अंतील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने तक्रार केली होती. ही तक्रार आता महिला पोलीस ठाण्याला पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले की, महिलेने तिच्या तक्रारीत अनेक आरोप केले आहेत. ही महिला मूळची मुरादाबादमधील कटघरची आहे.
काय आहे प्रकरण?
महिलेने तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, ती पतीच्या कार्यालयात संभल हिंसाचाराचा व्हिडिओ पाहत होती. तेव्हा तिच्या पतीने तिला असे व्हिडिओ पाहू नको असे सांगितले होते. पुढे या महिलेने तिच्या पतीला सांगितले की, संभल हिंसाचार प्रकरणात पोलिसांची भूमिका कौतुकास्पद आहे. यावर तिचा पती संतापला आणि त्याने पत्नीला तिहेरी तलाक दिला.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे २०१२ मध्ये मुरादाबाद येथील एका व्यक्तीशी लग्न झाले आणि २०२१ मध्ये घटस्फोट झाला. तिला तीन मुले होती. यानंतर तिची गुडगावमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी भेट झाली आणि त्या व्यक्तीशी तिचे नाते निर्माण झाले. महिलेचे म्हणणे आहे की, या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु नंतर तो टाळाटाळ करू लागला. जेव्हा महिलेने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली तेव्हा या व्यक्तीने तिच्याशी लग्न केले.
कसा सुरू झाला संभल हिंसाचार
न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान 24 नोव्हेंबर रोजी पाहणी पथकाने उत्खनन केल्याच्या अफवेमुळे मशिदीत गर्दी जमली. यानंतर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केली, ज्यात गोळी लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर उत्तर प्रदेशसह देशातील वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी संसदेतही याप्रकरणी आवाज उठवला होता. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी संभलला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. पण, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांना माघारी फिरावे लागले होते.