२२ वर्षीय मुलीने प्रियकराशी लग्न केलं म्हणून तिच्या वडिलांनी तिची हत्या केली. या प्रकरणात एका पोलीस निरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. त्याला ही सगळी घटना माहीत होती तरीही त्याने सगळी घटना लपवून ठेवली आणि हत्या नाहीतर आत्महत्या आहे असं भासवलं असा आरोप त्याच्यावर आहे. आंध्र प्रदेशात मार्च महिन्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
चौडेश्वरी नावाच्या २२ वर्षीय मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधांना चौडेश्वरीच्या घरातल्यांनी विरोध दर्शवला होता. ४ मार्चला या मुलीने तिच्या आई वडिलांचं घर सोडलं आणि प्रियकराशी लग्न केलं. आई वडिलांचा विरोध पत्करुन या मुलीने हे पाऊल उचललं. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर काही दिवसांनी तिच्या घरातल्या लोकांनी पोलिसात तक्रार नोंदवली आणि तिचा शोध घेण्याची विनंती केली. त्यावेळी मर्चला येथील सर्कल इन्स्पेक्टरने या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला शोधलं. १५ मार्चला तो तिला आई वडिलांच्या घरी परतून जा अशी सक्ती करु लागला. या मुलीला तिच्या आई वडिलांना सोपवण्यात आलं. यानंतर तीन दिवसांनी चौडेश्वरी तिच्या आई वडिलांच्या घरी मृतावस्थेत सापडली.
कुटुंबाने रचला मुलीच्या आत्महत्येचा रचला बनाव
चौडेश्वरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने मुलीने आत्महत्या केली आहे असा बनाव रचला. पोस्टमॉर्टेमच्या अहवालात मात्र ही बाब समोर आली की मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला आहे. शिवाय ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. डॉक्टरांनी हे सांगितलं की सदर मुलगी झोपलेली असताना उशीने तिचं नाक आणि तोंड दाबण्यात आलं. श्वास न घेता आल्याने गुदरमरुन या मुलीचा मृत्यू झाला. हा अहवाल आल्यानंतर मुलीचे वडील चंद्रासीनू आणि आणखी एका नातेवाईकाला अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली तेव्हा वडिलांनी मुलीने त्यांच्या मनाविरुद्ध प्रियकराशी लग्न केल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस निरीक्षकाचं निलंबन
पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास केला तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की सर्कल इन्स्पेक्टरने या प्रकरणात चौडेश्वरीच्या मुलीच्या कुटुंबाला मदत केली आहे. ही हत्याच आहे ही कल्पना असूनही त्याने आत्महत्या असल्याचा अहवाल दिला. मुलीच्या कुटुंबाच्या सांगण्यावरुन त्याने हे केल्याचं समोर आलं आहे. तसंच मुलीच्या वडिलांनी त्याला लाच दिल्याची बाबही तपासात समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी या इन्स्पेक्टरचं निलंबन कऱण्यात आलं आहे.
