आज करवा चौथ आहे, या दिवशी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवाकडे प्रार्थनाही करतात. मात्र या दिवसाच्या आदल्याच दिवशी मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेची तिच्या पतीनेच हत्या केल्याची ही घटना आहे. ग्वाल्हेर या ठिकाणी असलेल्या त्यागी नगर भागात मधु श्रीवास्तवची हत्या तिचा पती आनंद श्रीवास्तवने केली आहे. त्यानंतर आनंद श्रीवास्तव पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्हाही मान्य केला.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुच्या डोक्यावर एकाहून अधिक वार होते, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. मधुला तिच्या पतीने म्हणजे आनंदने ठार केलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा मान्य केला. आपणच आपल्या पत्नीची म्हणजेच मधुची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. मधु आणि आनंद यांच्या मुलाने पोलिसांना चौकशी दरम्यान हे सांगितलं की माझे वडील आणि आई म्हणजेच आनंद आणि मधु यांच्यात सातत्याने वाद होत असत. दोघंही एकमेकांच्या घरातल्या लोकांना दुषणं द्यायचे. माझ्या वडिलांनी आईला ठार केलं. त्याच्या आधी एक दिवस स्वयंपाकावरून वाद झाला होता.
आनंदची चौकशीही करण्यात येते आहे
पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली की मधु आणि आनंद या दोघांचं लग्न २०१० मध्ये झालं होतं. या दोघांनीही प्रेम विवाह केला होता. या जोडप्याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्यं आहेत. दरम्यान आनंदने मधुची हत्या का केली हे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस त्या कारणाचा शोध घेत आहेत आणि या प्रकरणात आनंदचीही चौकशी करण्यात येते आहे.
ग्वाल्हेरचे पोलीस अधिकारी संदीप बांगरे यांनी काय सांगितलं?
ग्वाल्हेरचे पोलीस अधिकारी संदीप बांगरे म्हणाले की मधु आणि आनंद यांचा प्रेमविवाह झाला होता तरीही दोघांमध्ये खटके उडत होते आणि वाद होते हे त्यांच्या मुलांनीही सांगितलं. दरम्यान हत्येच्या वेळी नेमकं काय झालं? पत्नीला म्हणजेच मधुला ठार करण्याचं टोकाचं पाऊल आनंदने का उचललं ते समजू शकलेलं नाही. आनंद श्रीवास्तवला आम्ही या प्रकरणात अटक केली आहे कारण त्याने खुनाचा गुन्हा मान्य केला आहे. आनंदची चौकशी आम्ही करतो आहोत. ज्यानंतर हत्येचं कारण समोर येणार आहे. तसंच ही घटना ज्या घरात घडली तिथेही आमचे कर्मचारी आणि अधिकारी गेले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि घटनास्थळावर मिळालेले पुरावे आणि इतर माहिती घेतली आहे. या हत्येमागचं कारण आम्ही शोधून काढू असंही त्यांनी सांगितलं.
