अरुण शर्मा हा पेशाने रेडिओलॉजिस्ट तर काजल ही परिचारिका अर्थात नर्स होती. दोघंही एका नर्सिंग होममध्ये काम करत होते. एकमेकांसह काम करत असल्याने दोघांची ओळख झाली, कामाचे तास जास्त काळ एकत्र राहिल्याने दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली. मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. गुरुग्रामच्या नर्सिंग होममध्ये दोघंही काम करत होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वीच म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी लग्न केलं. दोघांच्या आयुष्याचा नवा टप्पा सुरु झाला. मात्र अवघ्या चार महिन्यातच अरुणने काजलची हत्या केली. हुंडा दिला नाही म्हणून अरुणने काजलला संपवलं. गुरुग्राम या घटनेने हादरलं आहे.

नेमकी काय घटना घडली?

अरुण आणि काजलचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर अरुण काजलला मारहाण करु लागला. तसंच तुझ्या कुटुंबाने मला हुंडा दिलेला नाही. जा माहेरुन पैसे घेऊन ये म्हणत तिचा छळ करु लागला. काजलच्या भावाने हे आरोप केले आहेत. दरम्यान होळीच्या दिवशी म्हणजेच ४ मार्चला काजल आणि अरुण काजलच्या आई वडिलांच्या घरी राहण्यास आले होते. यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच १७ मार्चला अरुण मद्यपान करुन आला आणि त्याने काजलला मारहाण केली. १८ तारखेच्या सकाळी काजल त्याला वरच्या मजल्यावरुन खाली घेऊन आली इथे या दोघांचा वाद सुरु झाला. त्यानंतर काही वेळात काजल बेशुद्ध झाली. तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं. ज्यानंतर काजलला तिच्या कुटुंबाने रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

काजलच्या कुटुंबाने काय आरोप केला?

काजलच्या कुटुंबाने हा दावा केला आहे की त्यांना स्वच्छतागृहात एक सिरिंज आढळून आली. अरुणने तिला त्या सिरिंजद्वारे विष दिलं आणि ठार केलं असा संशय काजलच्या घरातल्या लोकांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजलला आपण विषारी इंजेक्शन दिलं होतं हे अरुणने मान्य केलं, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला हेदेखील कबुल केलं. पोलिसांनी या प्रकरणात अरुणला अटक केली आहे. अरुण गाझियाबाद या ठिकाणी असलेल्या बेहता हाजिपूर या ठिकाणी होता. तिथून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडण्यात आलं आहे अशी माहिती गुरुग्राम पोलीस ठाण्याचे अधिकारी कुलदीप सिंग यांनी दिली आहे. काजलच्या मृतदेहाचा व्हिसेरा काढण्यात आला आहे. जो आता तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण कळणार आहे असंही पोलिसांनी सांगितलं.