Blue Drum Case Threat Bulandshahr:
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे २०२५ मध्ये मुस्कान रस्तोगी नामक महिलेने प्रियकराच्या साथीने स्वतःच्या पतीची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये कोंबून त्यावर सिमेंट टाकले होते. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीची हत्या करण्याचे काही प्रकारही समोर आले होते. यामुळे आता निळ्या ड्रमची पुरूष वर्गात चांगलीच दहशत पसरल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेत आहे.

बुलंदशहरमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या राजकुमारने स्वतःच्या पत्नीला तिच्या प्रियकराबरोबर जाण्याची मुभा दिली. दौलतपूर येथे राहणाऱ्या राजकुमारचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांना सहा महिन्यांचे बाळ आहे. राजकुमारने सांगितले की, त्याच्या पत्नीचे एका पुरूषाशी प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती.

राजकुमारने माध्यमांशी बोलताना पुढे सांगितले की, त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर अधूनमधून एकमेकांना खासगीत भेटत होते. तसेच त्यांचा फोनवरूनही एकमेकांशी संवाद होता. मागच्या वर्षी जुलै महिन्यात पत्नी माहेरी गेली होती. पण ती माहेरी न जाता तिच्या प्रियकराबरोबर राहत होती. मी याबद्दल विचारणा केली तर ती माझ्याकडे पुरावा मागत असे.

निळा ड्रम, सिमेंटचा उल्लेख असलेली फेसबुक पोस्ट

काही काळापूर्वी पत्नी फोनवर बोलत असताना राजकुमारने तिच्या हातातून फोन हिसकावला आणि फोन तपासला असता ती प्रियकराशी बोलत असल्याचे आढळले. तसेच तिचे प्रियकराबरोबरचे आक्षेपार्ह फोटोही आढळून आले. तसेच त्याला एक फेसबुक पोस्ट आढळून आली, ज्यात सिमेंट आणि निळ्या ड्रमचा उल्लेख होता.

राजकुमारने जेव्हा पत्नीला प्रियकराशी संबंध तोडायला सांगितले, तेव्हा पत्नीने उलट त्यालाच निळ्या ड्रम प्रकरणाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर भेदरलेल्या पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी हे प्रकरण महिला मध्यस्थी कक्षाकडे वर्ग केले. जिथे दोन्ही पक्षांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी महिलेचा प्रियकरही तिथे आला.

सुनावणीदरम्यान पत्नीने प्रियकराबरोबर राहण्याचा निर्णय ठाम असल्याचे सांगितले. यानंतर राजकुमार आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला प्रियकराबरोबर राहू देण्याची संमती दिली. राजकुमारने म्हटले की, माझा जीव वाचविण्यासाठी मी हा निर्णय घेतला.