करोनाचा प्रादुर्भाव देशभरातच वाढताना दिसत आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगाची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनापासून बचावण्यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे आणि शारिरीक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र आपल्याला मास्क लावायला सांगितलं या वादातून एका व्यक्तीने चक्क सरकारी कार्यालयावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघं जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहे.

मॉस्कोमध्ये आज ही घटना घडली. या घटनेबद्दल इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोचे महापौर सर्जी सोब्यॅनिन यांनी माहिती दिली की या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. त्यांनी या व्यक्तीबद्दल कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही, तसंच या व्यक्तीच्या हल्ला करण्याच्या हेतूबद्दलही काही स्पष्ट केलेलं नाही. या हल्ल्यात दोन व्यक्ती ठार झाल्या असून चार जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये एका १० वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. हल्ला करणारा हा इसम ४५ वर्षांचा असून तो मॉस्कोचाच रहिवासी आहे, अशी माहिती हाती येत आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून त्यातल्या तिघांची परिस्थिती गंभीर आहे.

नक्की घडलं काय?

करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभराप्रमाणेच रशियामध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं तिथे अनिवार्य करण्यात आलं आहे. मॉस्कोतही हा नियम लागू असताना ही व्यक्ती मास्क न घालता शहरातल्या एका सरकारी कार्यालयात गेली, जिथे पासपोर्टसाठी अर्ज करणे, घरं आणि तत्सम मालमत्तेसंदर्भातली कागदपत्रं मिळवणे आणि इतर काही कामांसाठी मदत मिळवणे अशी कामं केली जातात. या कार्यालयात जात असताना प्रवेशद्वाराजवळच या इसमाला सुरक्षारक्षकाने अडवले. मास्क घातला नसल्याने सुरक्षारक्षकाने या इसमाला मास्क घालण्यास सांगितले.

या गोष्टीने संतापलेल्या या ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या खिशातून बंदूक काढली आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात दोघे जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक बंदूक सापडली आहे. मात्र अशा प्रकारची बंदूक आणि तत्सम हत्यारं जवळ बाळगणं यावर रशियामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची बंदूक बाळगण्याची परवानगी फक्त व्यावसायिक स्पोर्ट्स शूटर्सना देण्यात आली आहे, मात्र तेही बंदूक सोबत बाळगू शकत नाहीत, त्यांना ती बंदूक आपल्या खेळाच्या ठिकाणीच जमा करावी लागेल.