Man Posing as IAS Arrested: UPSC अर्थात केंद्रीय लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न असतं. प्रत्येकाला आपापल्या आरक्षित श्रेणीनुसार ४ किंवा त्याहून अधिक वेळा ही परीक्षा देता येते. तुम्हाला परवानगी असलेली मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला ना ही परीक्षा पुन्हा देता येत ना कधी IAS किंवा इतर प्रथम वर्ग अधिकारी होता येत. पण झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चारही वेळा यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरल्यानंतरदेखील एका महाभागाने आपण आयएएस अधिकारी असल्याचं सांगून तब्बल ७ वर्षं आसपासच्या सरकारी कार्यालयांमधले अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला. अखेर स्वत:च केलेल्या एका चुकीमुळे ही व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली!

म्हणे UPSC दिली, IAS झालो!

या संपूर्ण प्रकाराचं सविस्तर वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. सदर फसवणूक करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीचं नाव राजेश कुमार असून झारखंडच्या हुसेनाबाद पोलीस स्थानकात स्वत:च एका प्रकरणात IAS असल्याचं सांगून राजेश कुमार दाखल झाला होता. त्यानं बोलण्यात केलेल्या विशिष्ट उल्लेखांमुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि सरतेशेवटी सखोल माहिती काढली असता राजेश कुमारचं बिंग फुटलं! राजेश कुमारकडे कारवर Government of India असं लिहिलेली निळ्या रंगाची पाटी, स्वत:च्या नावाची बनावट पदवीसह पाटी, बनावट ओळखपत्र आणि इतर खोटी कागदपत्र आढळून आली. विशेष म्हणजे आपल्या IAS कारकिर्दीचे त्यानं तोंडपाठ करून ठेवलेले तपशीलही पोलिसांनी जबाबात नोंदवून घेतले!

२ जानेवारी रोजी हे सगळं प्रकरण उघड व्हायला सुरुवात झाली. हुसैनाबाद पोलीस स्थानकातील मुख्य पोलीस अधिकारी सोनू कुमार चौधरी यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कुमार नाव सांगितलेला हा व्यक्ती २ जानेवारी रोजी पोलीस स्थानकात आला. आपण २०१४ सालचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी असून भुवनेश्वरमध्ये मुख्य लेखाअधिकारी म्हणून नियुक्त असल्याचं त्यानं सांगितलं. एका कामानिमित्त आपण सुट्टीवर असून आपल्या मूळगावी गेलो असता एका नातेवाईकाचा जमिनीशी संबंधित वादाचा मुद्दा सोडवायचा आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं.

…आणि पोलिसांना शंका आली!

या सर्व घडामोडी चालू असताना पोलिसांकडून राजेश कुमारसाठी एखाद्या आयएएस अधिकाऱ्यासाठी पाळला जातो, तसाच प्रोटोकॉल पाळला जात होता. पण काही वेळानंतर राजेशवर पोलिसांना संशय यायला लागला. कारण राजेशनं ओडिशा कॅडरचे अधिकारी असल्याचं सांगूनही आपली बदली डेहराडून, हैदराबाद आणि भुवनेश्वर या ठिकाणी झाल्याचं सांगितलं. अधिक प्रश्न विचारले असता राजेश कुमार आपण IAS नसून IPTAFS अधिकारी असल्याचं सांगायला सुरुवात केली. “राजेश कुमारच्या उत्तरांमधल्या अनियमिततेमुळे आमचा संशय बळावला. कोणताही आयएएस अधिकारी कार्यालयीन संभाषणादरम्यान इतक्या सहज आपल्या सेवेचे पद बदलणार नाही”, असं सोनू चौधरी म्हणाले.

चौकशी झाली आणि धक्कादायक माहिती आली समोर

राजेश कुमार पोलीस स्थानकातून गेल्यानंतर सोनू चौधरी यांनी त्यांच्या वरिष्ठांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यांच्या वरिष्ठांनी राजेश कुमार सांगत असलेल्या आयएएस बॅचसंदर्भात चौकशी केली असता हे नाव असलेला कोणताही अधिकारी तो सांगत असलेल्या बॅचमध्ये, कॅडरमध्ये किंवा IAS मध्ये अस्तित्वातच नसल्याचं समोर आलं. यानंतर राजेश कुमारला नजीकच्याच परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. त्याची ह्युंदाई कारदेखील ताब्यात घेतली गेली. मग मात्र राजेश कुमारनं फसवणूक केल्याचं मान्य केलं.

अधिक चौकशी केली असता पोलिसांना समजलं की राजेश कुमार आसपासच्या भागात अनेक वर्षांपासून स्वत: आयएएस असल्याची बतावणी करत होता. तो त्याच्या कारवर ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन’ची पाटी लावून फिरत असे. आपली कामं करून घेण्यासाठी आसपासच्या पोलीस स्थानकात आणि सरकारी कार्यालयांमध्ये राजेश कुमार आयएएस म्हणून फिरत असे.

का केली IAS म्हणून फसवणूक?

राजेश कुमारनं पोलिसांना दिलेल्या जबाबात आपली पार्श्वभूमी सांगितली. आयएएस होणं हे राजेश कुमार आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. परीक्षेच्या तयारीसाठी राजेश कुमार दिल्लीलाही गेला होता. चार वेळा त्यानं परीक्षा दिली. पण तो परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. एकदा पूर्व परीक्षा उत्तीर्णही झाला, पण पुढच्या टप्प्यापर्यंत तो पोहोचू शकला नाही. आपल्या वडिलांची अपेक्षा पूर्ण करू शकलो नसल्याचं घरी कसं सांगायचं? या विवंचनेतून राजेश कुमारनं घरी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झाल्याचं कबूल केलं. गेल्या अनेक वर्षांपासून राजेश कुमार सगळ्यांना हेच सांगत आला.

राजेश कुमार खरा कोण?

पोलिसांच्या तपासात आढळून आलं की राजेश कुमार वास्तवात एक कनिष्ठ श्रेणतील मुख्य लेखा अधिकारी आहे. त्याच्या कारमध्ये पोलिसांना अनेक खरी कागदपत्र सापडली. त्यात चाणक्य आयएएस अकादमीचं ओळखपत्र, ग्रंथालयाचं ओळखपत्र आणि कारवरची निळ्या रंगाची पाटी सापडली. राजेश कुमारला पोलिसांनी अटक केली असून भारतीय न्याय संहितेतील बनावट ओळख व कागदपत्रांसंदर्भातील कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.