एका माणसाने त्याच्या आईच्या प्रियकरावर चाकूचे १६ वार केले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्या प्रियकराच्या मृतदेहावर पाय देऊन तो उभा होता. पोलीस आले त्यांनी या माणसाला अटक केली. ही धक्कादायक घटना कर्नाटकमधल्या बेळगावात घडली आहे. मागच्या १० वर्षांपासून आईशी प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीच्या विरोधातला हा राग मुलाने अशा पद्धतीने बाहेर काढला.

बसप्पा होसामणी या व्यक्तीची हत्या

बसप्पा होसामणी असं ५१ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्याचीच हत्या करण्यात आली. बसप्पा हा बसादोणी गावाचा रहिवासी होता. सोमवारी संध्याकाळी इरय्या मठापतीने त्याला रस्त्यात अडवलं. इरय्याने बसप्पावर चाकूचे १६ वार केले आणि त्याची हत्या केली. इरय्या मठापतीने बसप्पाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी इरय्याला अटक केली. इरय्याने पोलिसांना सांगितलं बसप्पाने माझ्या आईला पळवून नेलं होतं. माझ्या आईचे आणि त्याचे प्रेमसंबंध होते त्याने माझ्या आईला कोल्हापूरमध्ये ठेवलं होतं. १० वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मला ते मुळीच आवडलं नाही त्यामुळे मी त्याची हत्या केली. बसप्पा या भागात पुन्हा आला तेव्हा मी त्याची वाटच बघत होतो. मला त्याच्यावर सूड उगवायचा होता जो मी उगवला असं इरय्याने पोलिसांना सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

येलम्मा मंदिराजवळ बसप्पाची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरय्या मठपतीने येल्लमा मंदिराजवळ बसप्पाची हत्या केली. त्याच्यावर १६ वार केले. त्यानंतर तो मृतदेहाच्या छातीवर पाय देऊन पोलीस येईपर्यंत तसाच उभा होता. सोमवारी संध्याकाळी ही घटना बेळगावमध्ये घडली. इरय्याची आई आणि बसप्पा यांचे प्रेमसंबंध होते. हे दोघंही कोल्हापूरमध्ये राहण्यास गेले होते. दहा वर्षांपासून दोघंही कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होते. मात्र बसप्पाविषयी इरय्याच्या मनात राग होता. त्यामुळेच त्याने बसप्पाची अत्यंत क्रूर आणि निर्घृण पद्धतीने हत्या केली.

मला बसप्पाचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याची हत्या केली-इरय्या

बसप्पा दहा वर्षांपूर्वी माझ्या आईला घरातून घेऊन पळाला होता. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मला ही बाब मुळीच पटली नाही. बसप्पाने फूस लावून माझ्या आईला पळवून नेलं. मला हे न पटल्याने मी बसप्पाला संपवण्याची संधी शोधत होतो असं इरय्याने सांगितलं. दरम्यान ही घटना पाहणारे लोकही धक्क्यातच होते. एका माणसाने भररस्त्यात मृत्यूचा क्रूर खेळ दाखवला. जी घटना घडली त्यामुळे आम्ही सगळेच घाबरलो होतो असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.