दोन वेगळ्या ट्रेनमध्ये एका महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले होते. ही घटना कशी घडली असेल? याचा तपास पोलीस करत होते. आता या घटनेचा त्यांनी छडा लावला आहे. आरोपीला शोधून काढणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव कमलेश आहे. त्याने मीराबेन नावाच्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने त्याला प्रतिक्रार केला, ज्यानंतर त्याने तिची हत्या केली.

कुठे घडली आहे ही घटना?

मध्य प्रदेशातल्या उज्जैनहून निघालेल्या दोन ट्रेन्समध्ये महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळले होते. ज्यानंतर हा नेमका प्रकार तरी काय? याचा विचार करुन पोलीसही चक्रावून गेले होते. रतलाममध्ये राहणारी मीराबेन नावाची महिला ६ जूनपासून गायब झाली होती. तिचा छडा लावताना या दोन्ही प्रकारांतली महिला एकच आहे हे स्पष्ट झालं.

हे पण वाचा- विवाहबाह्य संबंधांतून विरारमध्ये महिलेची हत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीराबेन नावाच्या महिलेचं तिच्या नवऱ्याशी भांडण झालं होतं. ज्यानंतर ६ जूनला तिने घर सोडलं. उज्जैन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मीराबेन आली. त्यावेळी तिची ओळख कमलेश नावाच्या एका व्यक्तीशी झाली. मीराबेन एकटी आहे हे पाहून कमलेशने तिला सहानुभूती दाखवली, तिची चौकशी केली. मीराबेनला वाटलं की कमलेश हा चांगला माणूस आहे. त्याने मीराबेनला सांगितलं की तुम्ही माझ्या घरी चला आणि आराम करा. मीराबेनने कमलेशवर विश्वास ठेवला. ती त्याच्या घरी गेली. कमलेशने जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यामुळे मीराबेनची शुद्ध हरपत होती. त्या अवस्थेत कमलेशने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र मीराबेन बेशुद्ध झाली नव्हती त्यामुळे तिला काय घडतं आहे ते लक्षात आलं. तिने प्रतिकार करायला सुरुवात केली. कमलेशला याचा राग आला. ज्यानंतर कमलेशने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. यात मीराबेनचा मृत्यू झाला.

आरोपी कसा पकडला गेला?

मीराबेनच्या मृत्यूनंतर कमलेशने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं. त्याने या मृतदेहाचे तुकडे केले आणि दोन बॅगांमध्ये भरले. बॅगा घेऊन तो उज्जैन रेल्वे स्टेशनवर आला. त्याने एक बॅग इंदूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तर दुसरी बॅग ऋषिकेशला जाणाऱ्या योग नगरी एक्स्प्रेसमध्ये ठेवली. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला. कमलेशने सफाईदारपणे ही हत्या केली होती. मात्र घरी आल्यानंतर त्याने मीराबेनच्या मोबाइलमध्ये आपल्या फोनचं सीम कार्ड टाकलं. या एका चुकीमुळे तो पकडला गेला. मोबाइल नंबर ट्रॅक करुन पोलिसांनी कमलेशला रतलाममधून अटक केली. मीराबेनच्या हत्येचा खुलासा आरोपीने त्याच्या पत्नीसमोर केला. रतलामचे पोलीस सध्या या महिलेचीही चौकशी करत आहेत. नेटवर्क १८ ने हे वृत्त दिलं आहे.