केतन अग्रवालची हत्या त्याची होणारी पत्नी सियानेच केल्याचा आरोप आहे. ही घटना ताजी असतानाच अशाच बातम्या समोर येत आहेत. गुरुग्राम या ठिकाणी एका माणसाने त्याच्या पत्नीला प्रेयसीच्या घरी नेलं आणि तिथे गोळ्या झाडत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर हा इसम प्रेयसीला घेऊन फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकी काय घटना घडली?

अंकित नावाच्या २५ वर्षीय तरुणाचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालं होतं. मात्र त्याचं प्रेम त्याच्या प्रेयसीवर म्हणजेच रजनी देवीवर होतं. रजनी देवी ३८ वर्षांची आहे. अंकित हा गुरुग्राम मधील मानेसरचा रहिवासी आहे. तर त्याची प्रेयसी रजनी ही हरियाणातील जझ्झरची रहिवासी आहे. या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तर मागील तीन महिन्यांपूर्वी अंकितचं लग्न झालं होतं. रजनी ज्या खोलीत भाडे तत्त्वावर राहात होती तिथे अंकित त्याच्या पत्नीला घेऊन आला. तिथे अंकितने तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिला ठार मारलं. त्यानंतर अंकित आणि रजनी या ठिकाणाहून फरार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. अंकितने त्याच्या पत्नीला घेऊन रजनीच्या खोलीवर जायचं तिथे अंकितने पत्नीला ठार झाल्यावर दोघांनी पळ काढायचा हा कट या दोघांनी आधीच आखला होता असंही पोलिसांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मे महिन्यापासून फरार झालेल्या अंकितला अटक केल्यानंतर समोर उलगडलं गूढ

अंकितच्या लग्नानंतर तीन महिन्यांतच ही घटना घडली आहे. ही घटना मे महिन्यातील आहे. २१ मे पासून अंकितची पत्नी घरात नव्हती. त्यामुळे सुरुवातीला ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी नोंदवली. तसंच सासरच्या लोकांकडे जेव्हा तिच्याविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. त्यामुळे मग ही तक्रार दाखल करण्यात आली. तसंच अंकित किंवा त्याच्या घरातले काय घडलंय हे नीट सांगत का नाहीत? असाही प्रश्न त्यांना पडला होता आणि संशयही आला होता. ज्यानंतर मृत महिलेच्या आईने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला या महिलेला बेपत्ता समजून तिचा शोध सुरु केला होता. मात्र काही दिवसांनी पोलिसांना हा कट लक्षात आला. कारण पोलिसांनी फरार झालेल्या तिच्या नवऱ्याला अटक केली.

अंकित प्रेयसीसह नेपाळला पळाला होता

पोलिसांनी अंकित आणि त्याची प्रेयसी रजनी या दोघांनाही अटक केली आहे. अंकितचं मानेसर या ठिकाणी तंबाखूचं दुकान आहे. तर रजनी ही एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. तीन वर्षांपासून या दोघांचं सूत जुळलं होतं. याच कारणामुळे तीन महिन्यांपूर्वी अंकितचं ज्या स्त्रीशी लग्न झालं तिला त्याने संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितच्या पत्नीला ठार केल्यानंतर अंकित आणि रजनी हे दोघंही आधी हरिद्वारला गेले. तिथून नेपाळला पळाले होते. ३० जून पर्यंत हे दोघंही फरार होते. पण जेव्हा ते भारतात आले तेव्हा मानेसरचे पोलीस त्यांच्या मागावर होतेच. पोलीस या प्रकरणी आता पुढील कारवाई पूर्ण करत आहेत.