Crime News : मदुराई येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) कार्यालयात लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून ही आग दुर्घटना नसून तो काळजीपूर्वक कट रचून घडवून आणलेली हत्या होती, अशी माहिती समोर आली आहे.

महिला सिनियर ब्रँच मॅनेजर कल्याणी नांबी (५४) या त्यांच्या ऑफिस केबिनमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांचे सहकारी असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डी. राम (४६) याला अटक करण्यात आली आहे. राम याच्यावर काही फाईल्स नष्ट करण्यासाठी नांबी यांना पेटवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही घटना १७ डिसेंबरच्या रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एलआयसी इमारतीमध्ये घडली होती.

आगीत राम याला देखील काही जखमा झाल्या होत्या. राम याने पोलिसांना सांगितले होते की, कल्याणी यांच्याकडील दागिने चोरण्यासाठी एक अनोळखी तोंड झाकलेला व्यक्ती कार्यालयात घुसला आणि त्याने परिसरात आग लावली.

तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राम याचे जबाब हे बदलत होते. मात्र राम याच्या केबिनमधून पेट्रोलने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि दुचाकीतून पेट्रोल काढण्यासाठी वारलेले ट्यूब सापडली, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

कल्याणी यांच्या कुटुंबीयांकडूनही महत्त्वाची माहिती समोर आली. कल्याणी यांच्या मुलाने सांगितले की, मृत्यूच्या काहीवेळ आधी त्याच्या आईने त्याला फोन केला होता आणि काहीतरी धोका जाणवत असल्याने त्याबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितले होते. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या घटनेचा हत्येच्या अँगलने पुन्हा नव्याने तपास केला.

नेमकं हत्येचं कारण काय?

पोलिसांनी सांगितले की हत्येचे कारण हे व्यावसायिक वाद होते. अनेक इन्शुरन्स एजंट्सनी कल्याणी यांच्याकडे राम बद्दल तक्रार केली होती. राम हा कित्येक दिवसांपासून ४०हून अधिक मृत्यू दाव्यांच्या फाईल्स स्वत:कडे घेऊन बसला असल्याची त्यांची तक्रार होती.

जेव्हा कल्याणी यांनी त्याला याबद्दल विचारणा केली आणि याबद्दल वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवण्याचा इशारा दिला होता, तपासकर्त्यांनी सांगितले की रामने त्यांची हत्या करण्याचे आणि कागदपत्र नष्ट करण्याची योजना आखली.

पोलिसांनी स्पष्ट केले की, हत्येची ही घटना सुनियोजित होती. रात्री साडेआठच्या सुमारास रामने इमारतीचा मुख्य वीज पुरवठा कापला आणि तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्डाला बिघाडाबद्दल माहिती देणारा ईमेल देखील पाठवला.

त्यानंतर त्याने इमारतीचा काचेचा मुख्य दरवाजा साखळीने बंद केला, ज्यामुळे लॉबीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला. जेव्हा इमारतीमधील वीज केली, तेव्हा कल्याणी यांना कोणीतरी दरवाजा बंद करत असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी मदतीसाठी आरडाओरड देखील केली. त्यानंतर काही वेळाने राम कॅबिनमध्ये आळा, त्याने कल्याणी यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. त्यानंतर संपूर्ण खोलीत आग पसरली ज्यामुळे त्यांना पळून जाण्याची किंवा बचावाची कुठलीही संधी मिळाली नाही.

पोलिसांनी सांगितले की त्यानंतर ही दुर्घटना असल्याचे भासवण्यासाठी रामने त्याच्या स्वतःच्या केबिनलाही आग लावून दिली, असे करत असताना त्याला देखील काही ठिकाणी भाजले.

सत्य कसे समोर आले?

दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर रामने गुन्हा कबूल केला असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आले आणि सरकारी राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुरुवातीला या प्रकरणात अपघाती आग लागण्याचा गुन्हा नोंदवला होता मात्र नंतर पुरावे नष्ट करणे, गुन्ह्याची माहिती लपवणे, चुकीची माहिती देणे अशा भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, नष्ट झालेल्या फाईल्स आणि राम याची पेंडिंग इन्शुरन्स क्लेम याची तपासणी करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाचा पुढे तपास केला जात आहे.