Madhya Pradesh Poisonous Liquor AI: कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून मिळालेल्या अर्धवट माहितीच्या जोरावर घरातच हातभट्टी लावून विषारी दारू तयार करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या बनावट दारूमुळे देवास जिल्ह्यातील चंदना आणि बिनजना या दोन गावांमध्ये १३ जणांचा संशयित मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राठोड (वय २६, रा. इंदूर) असे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे. अजयने सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत ‘घरी दारू कशी तयार करावी’ यासाठी विविध एआय टूल्सवर सातत्याने माहिती शोधली. या अर्धवट माहितीच्या आधारे त्याने इंटरनेटवरून इंदूरमधील ‘रायझिंग ब्रदर्स’ नावाच्या सॉल्व्हेंट (द्रावक पदार्थ) विक्रेत्याचा संपर्क क्रमांक मिळवला आणि विषारी दारू तयार करण्यासाठी घातक औद्योगिक रसायने मागवली.
कचऱ्यातील बाटल्या आणि अस्सल दारूत भेसळ
देवास कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी शशिकांत चौरसिया यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी रसायने हाती आल्यानंतर अजय व त्याच्या साथीदारांनी बनावट दारू तयार करण्यास सुरुवात केली. ही दारू कचऱ्यातून गोळा केलेल्या रिकाम्या ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरण्यात आली. लोकांना संशय येऊ नये म्हणून ही बनावट दारू मूळ अस्सल दारूमध्ये मिसळून ग्रामीण भागात विकण्यात आली.

प्रशासनाचा आधी नकार, नंतर कारवाईचा बडगा
२७ सप्टेंबरपासून देवासमधील चांदना आणि बिंजना या गावांमध्ये एकापाठोपाठ १३ संशयास्पद मृत्यू झाले होते. सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा दावा फेाटाळून लावत या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हटले होते. मात्र मृतांचा आकडा वाढत गेल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात या बेकायदा दारू रॅकेटचा पर्दाफाश झाला.
११ जण अटकेत
या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. यामध्ये रासायनिक साहित्याचा पुरवठा करणारा इंदूरचा व्यापारी अमन कासलीवाल, बाटल्यांना झाकणे पुरवणारा सत्येंद्र ओझा यांच्यासह विशाल चौहान आणि रामेश्वर सिंग सोंगरा यांचा समावेश आहे. अजय राठोडचा मुख्य साथीदार गोविंद हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी रासायनिक साठवणुकीच्या गोदामावर छापा टाकून ते सील केले आहे. जप्त केलेली दारू आणि रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. मृतांचे शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच या मृत्यूंमागील नेमके कारण स्पष्ट होईल. आरोपींविरुद्ध मध्य प्रदेश उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
