भारतासह विदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ढोल-ताशा आणि डीजेच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये सर्वजण तल्लीन होऊन नाचत असतात. पण, आता तामिळनाडूत गणेश मिरवणुकीमध्ये एकजण बुरखा घालून नाचत असल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तामिळनाडूतील वेल्लोर येथे ही घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक व्यक्ती बुरखा घालून मिरवणुकीत नाचत असल्याचं दिसत आहे. याची तक्रार २१ सप्टेंबरला पोलिसांकडे करण्यात आली होती.




हेही वाचा : “बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल
या तक्रारीच्या आधारे पोलिसांच्या एका चमूने तपास सुरू केला. त्यानुसार विरूथपट्टू येथील एकास पोलिसांनी अटक केली आहे. अरूणकुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अरूणकुमारला पोलिसांनी अटक केली.
तसेच, धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणातील अन्य लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त दिलं आहे.