Suspected rabies patient In Gujrat: गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण कुत्र्यासारखा भुंकत हात जमिनीला टेकवून धावू लागला. आक्रमक झालेल्या या तरुणाने काही जणांना चावा घ्यायचा देखील प्रयत्न केला, असा दावा स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाला पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर काही महिन्यांनी रेबीज झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं घडलं काय?

बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम येथील नालासर गावात हा प्रकार उघडकीस आला. हा तरुण मजूर असून, विवाहित आहे. त्याला तीन मुलेही आहेत, अशी माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तरुणाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. दरम्यान, अनेक दिवस त्याला उपचार मिळाला मिळाला नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याने पत्नीवर हल्ला केला. घराच्या भोवतीने हिंसक होऊन धावू लागला. विचित्र स्वभाव पाहून घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला दोरखंडाने बांधून ठेवले आणि पहाटे तीन वाजता पालनपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातही हिंसक झाला तरुण

उपचार सुरु केल्यानंतर देखील तरुणाचे हिंसक वागणं कमी झाले नाही, माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. तरुणाने रुग्णालयातील बेडची मोडतोड केली, आरडाओरड केली यामुळे इतर रुग्णांमध्ये भीती पसरली होती. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आली. तरुणाला नियंत्रित करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले.

सध्या उपचार सुरु

जाळीच्या मदतीने त्याला पकडून बेडला बांधून ठेवण्यात आले. इंजेक्शनच्या मदतीने तरुणाला शांत करुन उपचार सुरु करण्यात आले, अशी महिती समोर आली आहे. “पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर हिंसक झालेल्या तरुणाला ३० जानेवारी रोजी उपचारासाठी पहाटे तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले”, अशी माहिती शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर सुनील जोशी यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तरुण हिंसक झाला होता पण, त्याला शांत करुन पुन्हा उपचार सुरु करण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती दिल्याचेही जोशी यांनी सांगितले.

रेबीज जीवघेणा आजार

“रेबीज हा जीवघेणा आजार आहे”, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. लक्षणे दिसू लागल्यानंतर व्यक्ती जिवंत राहणे जवळपास अशक्य असते. हा विषाणू मज्जासंस्था आणि मेंदूवर हल्ला करतो. रुग्णांना हायड्रोफोबिया, म्हणजेच पाण्याची भीती आणि तीव्र आक्रमकता येऊ शकते. रेबीजचा प्रसार कुत्रा चावल्याने किंवा लाळेद्वारे होऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर त्वरित लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.