Mandatory Military Service Countries List and US Draft News: अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारल्यानंतर त्यांच्या लष्करी सामर्थ्याची विविध पातळ्यांवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हेनेझुएला, इराणमध्ये लष्करी कारवाई केली. ग्रीनलँड आणि क्युबा ताब्यात घेण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने लष्करी सेवेसंदर्भात घेतलेला एक निर्णय वादात अडकला आहे. डिसेंबर २०२६ पासून अमेरिकेत १८ वर्षांच्या तरूणांची आपोआपच लष्करात नोंदणी होणार आहे. यापूर्वी १८ ते २५ वयोगटात तरुणांना स्वतःहून नाव नोंदवता येत होते. याला सिलेक्टिव्ह सर्व्हिस सिस्टिम असे म्हटले जात होते. मात्र आता सरकार ही प्रक्रिया बदलण्याच्या तयारीत आहे.
१८ वर्ष वय असलेल्या तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आली आहे का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अमेरिकेत सध्या लष्करी सेवा अनिवार्य नाही. पण जेव्हा देश मोठ्या संकटात अडकतो तेव्हा लष्कराला अधिक जवानांची गरज भासते, तेव्हा नोंदणी केलेल्या यादीतील तरूणांना बोलावण्याची शक्यता असते. याला ‘ड्राफ्ट’ म्हणतात.
अमेरिकेने व्हिएतनाम युद्धाच्या दरम्यान ड्राफ्ट लागू केला होता. या गोष्टीला आता ५० वर्षांचा काळ लोटला. यानिमित्ताने कोणकोणत्या देशांत लष्करी सेवा अनिवार्य आहे, याची मात्र चर्चा सुरू झाली आहे.
अनिवार्य लष्करी सेवा म्हणजे काय?
अनिवार्य लष्करी सेवेला सक्तीची लष्करी सेवाही म्हटले जाते. याचा अर्थ ठराविक काळासाठी नागरिकांना लष्करी सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. भारत आणि अमेरिकेत लष्करी सेवा ऐच्छिक आहे. जगातील २४ देशांमध्ये लष्करी सेवा अनिवार्य आहे. अंगोला, काबो वर्दे, चाड, माली, मोझांबिक, नायजर, सेनेगल, दक्षिण सुदान, सुदान अशा आफ्रिकन देशांमध्ये काही महिन्यांसाठी लष्करी प्रशिक्षण घेऊन सेवा द्यावी लागते.
आशियामधील देश
दक्षिण कोरिया: उत्तर कोरियाशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियात प्रत्येक पुरूषाला १८ ते २१ महिने लष्करी सेवा द्यावी लागते.
इस्रायल: पुरूष आणि महिला दोघांनाही सक्तीची लष्करी सेवा द्यावी लागते.
इराण: इराणमध्ये पुरुषांना १८ ते २४ महिने लष्करात सेवा द्यावी लागते.
युरोप
स्वित्झर्लंड: पुरुष लष्करी प्रशिक्षण घेतात आणि राखीव म्हणून त्यांची नोंद राहते.
नॉर्वे: पुरूष आणि महिलांसाठी सक्तीची लष्करभरती, मात्र केवळ निवडक गटच लष्करी सेवा देतो.
फिनलँड: पुरुषांसाठी अनिवार्य सेवा असली तरी निवडक जणच सेवेत कायम राहतात.
ग्रीस: प्रादेशिक सुरक्षा कारणास्तव पुरूषांसाठी अनिवार्य सेवा
इतर देश कोणते?
तुर्किये: पुरुषांसाठी अनिवार्य लष्करी सेवा मात्र दलातून बाहेर पडण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय उपलब्ध
सिंगापूर: सर्व पुरूषांसाठी राष्ट्रीय सेवा देणे बंधनकारक
ब्राझील: कागदावर अनिवार्य सेवा असली तरी प्रत्यक्षात कमी संख्येने भरती केली जाते.
क्युबा, इजिप्त, म्यानमार, थायलंड, उत्तर कोरिया, युएई आणि व्हिएतनाम अशा काही देशांमध्येही काही महिन्यांसाठी लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आलेली आहे.

लष्करी सेवा अनिवार्य का?
- सुरक्षेचा प्रश्न: दक्षिण कोरिया आणि इस्रायल या देशांना कायम युद्धाचा धोका असतो. त्यामुळे या देशात लष्करी सेवा अनिवार्य आहे.
- कमी लोकसंख्या: फिनलँड सारखे देश राखीव दलावर अवलंबून असतात.
- राष्ट्रीय धोरण: काही देश लष्करी सेवेकडे शिस्त आणि ऐक्य या दृष्टीने पाहतात. त्यामुळे त्यांनी लष्करी सेवा अनिवार्य केली आहे.
अमेरिकेतील लष्करी सेवा चर्चेत का?
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराण विरोधात युद्ध सुरू केले. काही आठवडे युद्ध चालेल, अशी अटकळ यामागे होती. मात्र इराणने हार मानण्यास नकार दिल्यानंतर युद्धाचा काळ वाढत गेला. अमेरिकेत सध्या ‘ड्राफ्ट’बाबत निर्णय झाला नसला तरी स्वयंचलित नोंदणीद्वारे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी कशाप्रकारे तयार राहता येईल, याची चर्चा होत आहे.
