दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव कुनू या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहे. या गावात कॉसा जमातीच्या रिवाजांनुसार सरकारी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या निधनाबद्दल गेले दहा दिवस दुखवटा पाळण्यात आला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मंडेला यांचे पार्थिव असलेली शवपेटी घेऊन आलेले हवाई दलाचे विमान कुनूपासून ३१ कि. मी. अंतरावर असलेल्या मथाथा या शहरात उतरले. शवपेटीसोबत वरिष्ठ नेते आणि मंडेला कुटुंबीय होते. मथाथा विमानतळावर लष्करी मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रस्तामार्गे कुनूकडे रवाना करण्यात आले.
कुनू येथे मानवी साखळी बनविण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. थेंम्बू जमातीच्या परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी वॉटरक्लूफ हवाई तळावरून मंडेला यांचे पार्थिव विशेष विमानाने रवाना करण्यात आले होते. दरम्यान, मंडेला यांचे घनिष्ठ मित्र आर्चबिशप डेस्मंड टुटु यांनी आपण मंडेला यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. मी ज्या व्यक्तीवर प्रेम केले त्या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी जावे, असे मला वाटत होते, परंतु मला बोलाविले न गेल्याने मी जाणार नसल्याचे ते म्हणाले. टुटु यांनी अलीकडच्या काळात राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि मंडेला यांच्या नातेवाईकांविरुद्ध जोरदार आवाज उठविल्याने त्यांना बाजूला सारण्यात आले असावे, असे जाणकारांचे मत आहे.