आपल्या देशातील देवस्थानांकडे मोठय़ा प्रमाणात सोने असून ते वितळवून त्यांचे रोखीकरण करण्याचा सरकारचा इरादा असला, तरी भक्तगणांनी देवाला अर्पण केलेले दागिने वितळवल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे.

एका श्रीमंत देवस्थानच्या अधिकाऱ्याने सांगितले, की सोन्याचे रोखीकरण करण्याच्या योजनेत मंदिरे लगेच सहभागी होणार नाहीत. काहींच्या मते ही योजना चांगली आहे पण अंतिम निर्णय अजून झालेला नाही. केरळचे श्री पद्मनाभस्वामी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर यांसारख्या अनेक देवस्थानांकडे भरपूर सोन्याचा साठा आहे पण तो भक्तांनी दागिन्यांच्या रूपात दिलेला आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा व राजस्थान या राज्यात सोने वितळवून रोखीकरण करण्यास अल्प प्रतिसाद असून आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व गुजरातेत प्रारंभीला थोडे स्वारस्य दाखवण्यात आले आहे. सोने वितळवल्याने त्याचे मूल्य कमी होईल व भक्तांच्या भावना दुखावतील, अशी भीती देवस्थांनांनी व्यक्त केली आहे. सोने रोखीकरण मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सुरुवात केली असून त्यात २२ हजार टन सोने घरे, धार्मिक संस्था पडलेले आहे, त्याचे रोखीकरण केले जाणार आहे. सोने दागिन्यांच्या स्वरूपात ठेवण्यास मान्यता असली, तरी ते वितळवून त्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे त्यामुळे शेवटी हे सोने संबंधितांना परत देताना .९९५ फाइननेस गोल्ड स्वरूपात दिले जाते किंवा भारतीय रुपयात त्याचे पैसे दिले जातात. गुजरातेत अंबाजी मंदिराने या योजनेत सोने ठेवण्यास नकार दिला आहे. सोमनाथ मंदिराने त्याबाबत प्रस्ताव तयार केला असला, तरी विश्वस्तांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. द्वारकाधीश मंदिराने काहीच केलेले नाही पण मंदिर समितीचे प्रमुख एच.के.पटेल यांनी योजना चांगली असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने १० किलो सोने बँकेत ठेवले आहे. १६९ किलो सोन्याचा वापर योजनेत करायचा की नाही याचा विचार चालू आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानची सोने या योजनेत ठेवायचे की नाही याबाबत बैठक होणार आहे.

मंदिर विश्वस्त संस्थेला जर सोन्याची गुंतवणूक योजनेत करायची असेल, तर ते वितळवावे अशी अट आहे; पण मुंबई उच्च न्यायालयाने विश्वस्तांना तसे करण्याची परवानगी दिलेली नाही. साईबाबा मंदिर संस्थानकडे ३८४ किलो सोने असून त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करण्यात येईल, आम्हाला तर योजनेत सोने गुंतवायचे आहे, पण न्यायालयाचे म्हणणे वेगळे आहे, असे विश्वस्तांनी सांगितले.

‘सोन्यासाठी बोली नाही’

साईबाबा मंदिर संस्थानकडे ३८४ किलो सोने व ४००० किलो चांदी आहे व १४८३ कोटींच्या मुदत ठेवी राष्ट्रीयीकृत बँकात आहेत पण सोन्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. संस्थानची उलाढाल वार्षिक ३५० कोटींची आहे व त्यावरील व्याजातून मंदिर संचालित रुग्णालयांसाठी किंवा भक्तांच्या  भोजनाची सोय करता येईल. मुंबईत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी सांगितले, की आमच्याकडे १६० किलो सोने आहे व त्यातील दहा किलो सोने स्टेट बँक ऑफ इंडियात ठेवले आहे, त्यावर १ टक्का वार्षिक व्याज मिळते. आम्ही या सोन्याचा वापर करू इच्छितो पण त्यासाठी कुणी बोली लावायला पुढे येत नाही.