भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळमोहिमेने सोमवारी यशाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. गेल्या ३०० दिवसांपासून निद्रावस्थेत असलेल्या लिक्विड अ‍ॅपॉजी मोटार या इंजिनाला प्रज्वलित करण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी पार पाडला. सुमारे चार सेकंद हे इंजिन प्रज्वलित अवस्थेत होते. प्रयोगाच्या यशस्वितेमुळे आता बुधवारी, २४ सप्टेंबरला मंगळयान मंगळाच्या कक्षेत सोडण्याचा मार्ग निर्धास्त झाला आहे. यानाने मंगळाच्या गुरुत्वीय प्रभावात प्रवेश केला असून या गुरुत्वीय प्रभावक्षेत्राची त्रिज्या ५.४ लाख किमी आहे. दरम्यान, अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या मावेन यानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला असून त्याने मंगळाभोवताली परिक्रमा सुरू केल्या आहेत.
इस्रोच्या वैज्ञानिकांनी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मार्स ऑर्बिटरवरील (मंगळयान) इंजिन प्रज्वलित केले. त्यासाठी अल्पसे इंधन लागले. इंजिन सुमारे चार सेकंद प्रज्वलित होते. मात्र, त्यासंदर्भातील संदेश इस्रोपर्यंत येण्यासाठी १२ मिनिटे लागली. या इंजिनाच्या मदतीने ४४० न्यूटन इतका जोर निर्माण केला जातो. गेल्या ३०० दिवसांपासून हे इंजिन निद्रितावस्थेत होते, त्यामुळे त्याच्या प्रज्वलित होण्यावर मंगळयान मोहिमेचे यशापयश अवलंबून होते. इंजिन प्रज्वलित होण्याचा हा टप्पा यशस्वी झाल्याने आता २४ सप्टेंबरला लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर हे इंजिन आणखी जास्त काळ प्रज्वलित करून मार्स ऑर्बिटर यान मंगळाच्या कक्षेत नेले जाईल.

अंतिम टप्पा बुधवारी..
* मंगळयानाचा अंतिम टप्पा बुधवारी,२४ सप्टेंबरला पार पाडण्यात येणार असून त्या वेळी लिक्विड अ‍ॅपॉजी मोटार २४ मिनिटे प्रज्वलित करून यानाचा वेग सेकंदाला २२.१ किलोमीटरवरून सेकंदाला ४.४ किलोमीटर इतका कमी केला जाईल व नंतर हे यान मंगळाच्या कक्षेत जाईल.
* मंगळाच्या कक्षेत जाण्यासाठी ही मोटार प्रज्वलित करण्याच्या आज्ञा अगोदरच पाठवण्यात आल्या आहेत. ही मोहीम यशस्वी झाली तर पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरणार.

मुख्य लिक्विड इंजिन चाचणी यशस्वी झाली आहे. ठरल्याप्रमाणे चार सेकंद मोटार प्रज्वलित करण्यात आली व मार्स ऑर्बिटर यानाचा मार्ग आणखी सुनिश्चित करण्यात आला. आता हे यान मंगळाच्या कक्षेत व्यवस्थितपणे प्रवेश करील असा आम्हाला विश्वास वाटतो. – इस्रो