पीटीआय, नवी दिल्ली – “मी ‘गांधीवादी’, ‘नेहरूवादी’, ‘राजीववादी’ आहे परंतु ‘राहुलवादी’ नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले. राहुल गांधी माझ्यापेक्षा खूप लहान आहेत आणि आम्हा दोघांच्या राजकीय जीवनातही खूप अंतर आहे असे अय्यर म्हणाले.

दरम्यान, स्वत:ला ‘इंदिरावादी’ न म्हणण्याचे कारणही अय्यर यांनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत केले. आणीबाणी केवळ १८ महिने असली तरी या निर्णयाशी असहमत होतो, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिप्पणीसंदर्भात विचारणा केली असता, जर ते माझ्यापेक्षा जवळजवळ ३० वर्षांनी लहान असतील आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसेल तर मी ‘राहुलवादी’ होण्याची अपेक्षा कोणी कशी करू शकतो, असा प्रतिप्रश्न अय्यर यांनी केला.

‘गांधीवाद ते राजीववाद’ “मी सहा वर्षांचा होतो आणि माझा भाऊ चार वर्षांचा होता जेव्हा महात्मा गांधींनी आम्हाला आपल्या हातात घेतले आणि म्हटले, ‘‘हे माझे सूर्य आणि चंद्र आहेत.’’ तेथून मी ‘गांधीवादी’ झालो. नेहरूंबद्दल बोलायचे झाले तर, ते पंतप्रधान झाले तेव्हा मी सहा वर्षांचा होतो आणि ते गेले तेव्हा २३ वर्षांचा होतो, त्यामुळे माझे संपूर्ण बालपण नेहरूवादी विचारांमध्ये गुंतले होते, म्हणूनच मी स्वतःला नेहरूवादी मानतो. मी स्वतःला ‘राजीववादी’ म्हणतो कारण जरी ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असले तरी त्यांनी मला पंतप्रधान कार्यालयात संधी दिली आणि त्यांच्या कामाने मला आश्चर्यचकित केले. विश्वास बसत नव्हता. अशा प्रकारे मी राजीववादी झालो.”