अगरताळा : त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून डॉ. साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

राजीनामा दिल्यानंतर बिप्लब कुमार देब हे शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले. पक्षाच्या संघटनेत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पक्षाचे सरचिटणीस तावडे विमानाने गेले होते. देब यांच्या राजीनाम्यानंतर बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी तीन नावांची चर्चा झाली होती.

काँग्रेसमधून आलेला भाजपचा चौथा मुख्यमंत्री

डॉ. माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आल्याने ईशान्येकडील राज्यात भाजपचे चौथे मुख्यमंत्री हे मुळचे काँग्रेस पक्षाचे असतील.  आसामचे हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे प्रेम खांडू, मणिपूरचे एन. बिरेन सिंह हे ईशान्येतील तीन राज्यांचे मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिपूरा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले डॉ. माणिक साहा हे मूळचे काँग्रेसचे. २०१६ मध्ये डॉ. साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ. साहा यांच्या नियुक्तीमुळे ईशान्येकडील राज्यात मूळचे काँग्रेसी  चौथे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून विराजामान होत आहेत.