बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा यांनी आज (रविवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माणिक साहा यांनी आगरतळा येथील राजभवनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले माणिक हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. याशिवाय ते त्रिपुरा भाजपाचे प्रमुख देखील आहेत. सहा वर्षांपूर्वी माणिक सहा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये केला होता प्रवेश.

त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून माणिक साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

काँग्रेसमधून आलेला भाजपचा चौथा मुख्यमंत्री

माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याने ते ईशान्येकडील राज्यात भाजपाचे असे चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत जे मूळचे काँग्रेसचे होते. आसामचे हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे प्रेम खांडू, मणिपूरचे एन. बिरेन सिंह हे ईशान्येतील तीन राज्यांचे मुख्यमंत्री जुने काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता त्रिपूरा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले डॉ. माणिक साहा हे मूळचे काँग्रेसचे आहेत. २०१६ मध्ये साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता.