पीटीआय, इंफाळ : मणिपूरमध्ये राज्य सरकार जातीय संघर्ष थांबवण्यात अपयशी ठरल्याने नागरिक संतप्त आहेत, असे मणिपूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्राद्वारे कळविले आहे. प्रदेशाध्यक्ष शारदा देवी, उपाध्यक्ष चिदानंद सिंग चौधरी आणि इतर सहा जणांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात नमूद केले आहे, की जनतेचा रोष आणि विरोध आता तीव्र होत चालला आहे, त्यामुळे सरकारला दीर्घकाळच्या अशांततेबद्दल जबाबदार धरले जात आहे.
विस्थापितांचे त्यांच्या मूळ निवासस्थानी त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी या पत्रात केली असून, त्यात नमूद केले, की ‘‘आपले सरकार राज्याची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम करीत असल्याची आम्हाला कल्पना आहे. आपला पक्षही राज्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’’ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक त्वरित पूर्ववत करण्यासह जनतेच्या विविध मागण्यांकडे नड्डा यांचे या पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.