Kuki Naga Conflict Manipur: मणिपूरमधून एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. कुकी गटाने एका लष्करी जवानासह २० जणांना ओलीस ठेवले आहे. उखरुल जिल्ह्यातील लिटन पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली. रजेवर असणारा जवान उखरुल-इम्फाळ रस्त्यावरुन जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले व ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नागा आणि कुकी गटात वाद

द प्रिंटने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नागा आणि कुकी समुदायात झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. कुकी गट नागा गटाने केलेल्या गोळीबाराला उत्तर देत होता. नागा गटाने कुकी गटाच्या दोन लोकांना ओलीस ठेवले होते, असा आरोप आदिवासी एकता समितीने (CoTU) द प्रिंटला माहिती देताना केला आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

मणिपूर पोलिसांनी ही घटना नागा आणि कुकी गटातील संघर्षामुळे झाल्याचे म्हटले आहे. कुकी गटाने ओलीस ठेवलेल्या जवान आणि नागरिकांच्या सुटकेसाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंंत्री यमनम खेमचंद सिंह यांनी देखील या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. एका अधिकृत निवेदनात त्यांनी चिंता व्यक्त करताना २० जणांची सुरक्षित आणि बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन केले आहे. सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेत यासाठी दोषी असणाऱ्यांना सरकार योग्य ती शिक्षा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गोळीबाराच्या घटनेनंतर वाद

कुकी समुदायातील शेतकऱ्यांवर नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक-मुइवाहच्या (NSCN-IM) हल्लेखोरांना गोळीबार केला, अशी माहिती आदिवासी एकता समितीच्या (CoTU) लुन किंगपिन यांनी द प्रिंटशी बोलताना दिली. 

शनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक-मुइवाह

NSCN-IM हा एक नागा कट्टरपंथी गट असून, त्यांची स्वतंत्र ध्वज आणि संविधानाची मागणी आहे. हा गट नागालँड, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमधील नागा-वस्ती असलेल्या भागात कार्यरत आहे. २०१५ मध्ये, या गटाने वेगळ्या ‘ग्रेटर नागालँड’ किंवा ‘नागालिम’ साठी दशकांपासून सुरू असलेली बंडखोरी संपवण्यासाठी केंद्रासोबत एक करार केला आहे.