मणिपूरमध्ये दरड कोसळून ८ मृत्युमुखी; मृतांमध्ये लष्करी जवानांचा समावेश; ७२ जण बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर

मणिपूरमध्ये नॉनी जिल्ह्यात दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७२ जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मृतांमध्ये लष्करी जवानांचा समावेश आहे.

dv manipur
मणिपूरमध्ये नॉनी जिल्ह्यात दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला

पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये नॉनी जिल्ह्यात दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७२ जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. मृतांमध्ये लष्करी जवानांचा समावेश आहे. तुपूल यार्ड रेल्वे बांधकाम छावणीजवळ ही दरड कोसळली. तुपूल यार्ड रेल्वे बांधकाम छावणीत भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात होती. गुरुवारी सकाळी भूस्खलन झाल्यानंतर त्याखाली या छावणीतील लष्करी जवान आणि कर्मचारी दबले गेले. ढिगारा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून गुरुवारी सायंकाळपर्यंत आठ मृतदेह सापडले असून त्यापैकी सात जण लष्करी जवान आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ढिगाऱ्याखाली ७२ जण अडकले असून त्यापैकी ४३ जण लष्करी जवान आहेत, अशी माहिती देण्यात आली.

या भागातून इजै नदी वाहत असून ढिगाऱ्यामुळे नदीला अडथळा निर्माण झाला असून सखल भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. नॉनी जिल्ह्याच्या उपआयुक्तांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. मृतांची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. इजै नदीला मोठा अडथळा निर्माण झाला असून नॉनी जिल्हा मुख्यालयात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरड कोसळल्याने नॉनी भागातील अनेक रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले असून प्रवाशांनी आणि पर्यटकांनी राष्ट्रीय महामार्ग ३७ चा वापर करू नये, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

गृहमंत्री, रेल्वेमंत्री यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याशी संपर्क साधला असून या दुर्घटनेविषयी माहिती घेतली आहे. शहा यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाची तीन पथके या ठिकाणी पोहोचली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मदत जाहीर

दुर्घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी तातडीने बैठक बोलावली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manipur landslide dead military personnel missing rescue battlefield ysh

Next Story
अग्निपथ योजनेविरोधातील ठराव पंजाब विधानसभेत संमत; राज्य सरकारचा योजनेला जोरदार विरोध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी