नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील किलोकरी गावात गोंधळ घालणार्या आणि मद्यपान करणार्या तरुणांना आवाज कमी करण्यास सांगितल्याने मणिपूरचे संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह (५४) यांना जमावाने बेदम मारहाण करून ठार मारल्याच्या प्रकरणात आठ-दहा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी सांगितले.
या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे रिजिजू म्हणाले.
सोमवारी पहाटे किलोकरी गावातील आपल्या घराबाहेर मोठ्या आवाजात बोलणार्या आणि मद्यपान करणार्यांना सिंह यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यावर डिलिव्हरी कामगार आणि ढाब्यावरील कर्मचार्यांच्या गटाने हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. या प्रकरणी विरोधकांनी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वंशभेदाचा हेतू होता का?
या हल्ल्यामागे वंशभेदाचा हेतू होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. सिंह हे मैतेई समाजाचे होते. त्यांच्या शेजारी राहणार्या एका महिलेने रात्री काही जण त्यांचा पाठलाग करताना पाहिले, पण तिने घाबरून घराचा दरवाजा बंद केला. सिंह गेल्या आठ-नऊ वर्षांपासून या परिसरात राहत होते.
देशाच्या राजधानीत स्वत:च्या घराबाहेर एका पित्याची हत्या होते. या घटनेनंतर दिल्लीत राहणारे ईशान्य
भारतातील प्रत्येक कुटुंब स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंतित आहे. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस या वाढत्या गुन्हेगारीवर काय करत आहेत? या घटनेचा वेगाने तपास करून दोषींना न्यायालयासमोर आणावे.- राहुल गांधी</strong>, नेते, काँग्रेस
