Manipuri Musician Chongtham Vikram Singh Murdered : दक्षिण दिल्लीत मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घराबाहेर काही जण गोंधळ घालत असल्याने सिंह यांनी त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. त्यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

५५ वर्षीय सिंह हे पत्नी आणि मुलासह दक्षिण दिल्लीतील किलोकरी गावात राहत होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते घराबाहेर आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्याशी वाद घालणाऱ्यांपैकी बहुतांश जण परिसरात डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात.

गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाद सुरू झाल्यानंतर काही वेळातच आरोपींनी सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. सिंह यांचा मुलगा यैफाबा याने त्यांना तातडीने ओखला येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या अहवालानुसार, जोरदार मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापती आणि त्यातून झालेला रक्तस्राव हे सिंह यांच्या मृत्यूचे कारण ठरले.

सात आरोपी अटकेत, अल्पवयीनही ताब्यात

दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलिस उपायुक्त विनीत कुमार यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सिंह यांच्या कुटुंबीयांची आणि समाजातील इतर सदस्यांची भेट घेतली असून, कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींचे वय १९ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

मणिपूरच्या रॉक संगीत क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व

विक्रम सिंह हे केवळ संगीतकार नव्हते, तर मणिपूरच्या रॉक संगीताच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक होते. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला मणिपूरच्या प्रसिद्ध ‘फिनिक्स’ रॉक बँडचे ते लीड गिटारिस्ट होते. त्यांनी ‘अल्ट्रा व्हायर्स’ या बँडमधून संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘फिनिक्स’मध्ये काम केले आणि पुढे ‘ईस्टर्न डार्क’ या प्रसिद्ध स्थानिक बँडमध्येही सहभागी झाले. नंतर त्यांनी मणिपूर सोडून नवी दिल्ली गाठली आणि संगीत शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू ठेवली.

‘फिनिक्स’चे प्रमुख गायक विवेक शर्मा यांनी सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी सिंह यांना ‘अत्यंत जवळचा मित्र आणि मोठ्या भावासारखी व्यक्ती’ असे संबोधले. संगीतातील अचूकता, परिपूर्णता आणि पडद्यामागची कामे सुरळीत पार पाडण्यात सिंह यांचा मोठा वाटा होता, असे शर्मा यांनी सांगितले. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे आपले काम करणारे आणि संगीतावर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी सिंह यांची आठवण सांगितली.

आईही मणिपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका

सिंह यांना संगीताचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. त्यांची आई चोंगथाम कमला या मणिपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. मणिपुरी चित्रपटसृष्टीत त्यांना एकेकाळी ‘मणिपूरची लता मंगेशकर’ म्हणून ओळखले जात होते. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मतामगी मणिपूर’ या पहिल्या मणिपुरी फीचर फिल्मसाठी त्यांनी गायन केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक गाणी रेकॉर्ड केली आणि चर्चासत्रे व कार्यशाळांच्या माध्यमातून मणिपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. त्या सध्या ८५ वर्षांच्या असून इम्फाळमध्ये राहतात.

मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांकडूनही निषेध

घटनेवर मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही चिंता व्यक्त केली. विक्रम सिंह यांचे संगीत क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील आणि त्यांचे अकाली निधन हे कुटुंब, संगीत क्षेत्र तसेच मणिपूरच्या जनतेसाठी मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले.

‘ईशान्येकडील लोक दिल्लीत सुरक्षित आहेत का?’ – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरी संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांच्या हत्येप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार चोंगथाम विक्रम सिंहजी आपल्या घराबाहेर मोठा आवाज करणाऱ्या काही जणांना आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी खाली गेले होते. त्यासाठी त्यांना बेदम मारहाण करून ठार करण्यात आले,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

“स्वतःच्या घराबाहेर, देशाच्या राजधानीत एका वडिलांची हत्या झाली. अशा अनेक घटना घडल्यानंतर आज दिल्लीत राहणारे ईशान्य भारतातील प्रत्येक कुटुंब एकच प्रश्न विचारत आहे. आम्ही इथे सुरक्षित आहोत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस या वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला, विशेषतः ईशान्य भारतातील नागरिकांविरोधातील घटनांना आळा घालण्यासाठी काय करत आहेत, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला.

या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विक्रम सिंह यांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केल्या.

दरम्यान, नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स सोसायटी दिल्ली युनिव्हर्सिटीनेही या हत्येचा निषेध केला असून निष्पक्ष आणि तातडीने तपास करण्याची मागणी केली आहे. सिंह यांचे परिचित बिरू चिडा शर्मा यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ते मुलांना गिटार शिकवत होते आणि मणिपूरच्या लोकांसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. “आमची मागणी स्पष्ट आहे. आमच्या भावाला न्याय मिळायला हवा,” असे त्यांनी म्हटले.