मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. या हल्ल्यात कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. मणिपूरमधील गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पिपल्स लिबरेशन फ्रंट आणि मणिपूर नागा पिपल्स फ्रंट या दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. हा हल्ला आपणच केल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केला आहे. तर या हल्ल्यामागे पिपल्स लिब्रेशन आर्मी ही दहशतवादी संघटना देखील असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत असून तपास सुरू आहे.
१९७८ मध्ये अस्तित्वात आलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीने यापूर्वीही असे हल्ले केले आहेत. मात्र शनिवारचा हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक असल्याचे म्हटले जात आहे. मणिपूरच्या चार भागात कार्यरत असलेल्या या दहशतवादी संघटनेचे सुमारे ४ हजार लढवय्ये सक्रिय असून मणिपूरला वेगळा देश बनवण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.




राजकीय आघाडीची स्थापना..
पीपल्स लिबरेशन आर्मी ही संघटना सुरुवातीपासूनच भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांना लक्ष्य करत आली आहे. त्यांनी १९९० मध्ये राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले न करण्याचे जाहीर केले होते. १९८२ मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रमुख थोडम कुंजबेहारी यांचा मृत्यू आणि १९८१मध्ये एन. बिशेश्वर सिंगच्या अटकेनंतर ही संघटना थोडी कमकुवत झाली. पण १९८९ मध्ये या संघटनेने रेव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (RPF) नावाने स्वतःची राजकीय आघाडी स्थापन केली. यासंदर्भात लाईव्ह हिंदुस्तानने वृत्त दिलंय.
संघटनेतील सर्वाधिक लोक मेईतेई आणि पंगल जातीचे…
आपण राज्यातील सर्व जमातींसाठी लढत आहोत, असा या संघटनेचा दावा आहे. परंतु राज्यातील नागा, कुकीस आणि इतर आदिवासी समूह त्यांच्यासोबत नाहीत. त्याचे लढवय्ये मेईतेई आणि पंगल जातीचे आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५३ टक्के लोक मेईतेई समुदायातील आहेत. आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोराम व्यतिरिक्त हे शेजारी देश बांगलादेश आणि म्यानमारमध्येही स्थायिक आहेत. या समाजातील लोक चीन-तिबेटी भाषा बोलतात.
शनिवारी घडलेली घटना..
४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी सकाळी एका लष्करी छावणीवर गेले होते. तेथून परतताना सकाळी १०च्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक हल्ला केला. दहशतवाद्यांनी ‘आयईडी’ स्फोट घडवून आणल्यानंतर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल ‘आसाम रायफल्स’च्या जवानांनीही गोळीबार केला. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी (४१), त्यांची पत्नी अनुजा (३६) आणि सहा वर्षांचा मुलगा अबीर यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चार जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत.
हेही वाचा – मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद; कर्नलची पत्नी आणि मुलाचाही मृत्यू
हेही वाचा – “तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ”, मणिपूरमधील दहशतवादी हल्ल्यावरून राहुल गांधींची मोदींवर टीका