इंफाळ – मणिपुरमधील विष्णुपूर जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्याचे वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री इंफाळ पश्चिम जिल्ह्यात हजारो नागरिकांनी संचारबंदी झुगारून भव्य ‘मशाल मोर्चा’ काढला. या दरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या तीव्र संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

गेल्या ७ एप्रिल रोजी विष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंग्लाओबी येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात दोन मुलांचा बळी गेला होता. या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ९ एप्रिल गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास सिंगजामेई परिसरातून हजारो लोक हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरले. “आरोपींना तात्काळ अटक करा,” अशा घोषणा देत हा जनसागर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाला.

सुरक्षा दलांशी संघर्ष आणि अश्रुधुराचा वापर

मोर्चा सुमारे दोन किलोमीटर पुढे सरकत चिंगमठक परिसरात पोहोचला. हे ठिकाण मुख्यमंत्री बंगला, पोलीस मुख्यालय आणि लोकभवन यांच्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. परिसरात सायं. ५ पासुन ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी (कलम १४४) लागू असल्याने सुरक्षा दलांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी सुरक्षा दलांविरुद्ध घोषणाबाजी केल्याने तणाव आणखी वाढला. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या चेंगराचेंगरीत आणि धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने अनेक जण जखमी झाले. किमान पाच जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मणिपूरमधील परिस्थितीचा फायदा घेऊन काही घटक सरकार आणि सुरक्षा दलांविरुद्ध अजेंडा राबवत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

“राज्यात सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. काही समाजकंटक लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विष्णुपूरमधील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांमधील वाढता असंतोष पाहता सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून संवेदनशील भागांत अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने जनतेला शांततेचे आवाहन केले असले तरी, जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा स्थानिक संघटनांनी घेतला आहे.