Manipur Drone Attack : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर आता मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता कुकी अतिरेक्यांनी रॉकेट बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे. काँग्रेस नेते मारेम्बम कोईरेंग हे मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री होते.

हेही वाचा : काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले.

दरम्यान, मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने ७ सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शुक्रवारी शिक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि केंद्रीय शाळा ७ सप्टेंबर रोजी बंद राहतील असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, ड्रोन आणि आता रॉकेटच्या हल्ल्यांनंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इम्फाळ जिल्ह्यात बॉम्ब हल्ले

काही दिवसांपू्र्वी मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील काही भागात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर १० जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. या गोळीबाराच्या आणि बॉम्ब हल्ल्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गोळीबार झालेल्या कौत्रुक गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.