मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात मंगळवारी मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जमावाने कूच केल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मणिपूरमधीलच सेनापती आणि त्याला लागून असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमेवर मंगळवारी पुकारलेल्या बंदच्या मुद्द्यावरून दोन आदिवासी समुदायांमध्ये संघर्ष झाला.
यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. थौबाल जिल्ह्यातील वांगजिंग तेंथा येथे नव्याने बांधलेल्या ‘बीडीओ’ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंगळवारी मुख्यमंत्री आले असताना कथित गोळीबारीची घटना घडली. पोलिसांच्या निवेदनानुसार, दगड आणि गोफण हातात घेऊन एक मोठा गट कार्यक्रमाच्या दिशेने येत होता.
पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही जमाव आक्रमकपणे पुढे सरकत राहिला, ज्यामुळे सार्वजनिक मालमत्ता आणि उपस्थित मान्यवरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. सुरुवातीला किमान बळाचा वापर करण्यात आला, मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर प्रस्थापित नियमांनुसार शेवटचा पर्याय म्हणून नियंत्रित गोळीबार करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एलांगबाम नंदबीर सिंह (४०) हे जखमी झाले. ते ‘ग्राम संरक्षण दला’चे जवान आहेत. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.
डोंगराळ भागात फिरताना मला कोणतीही अडचण आली नाही, पण थौबाल जिल्ह्यात भेटीला झालेला विरोध पाहून आश्चर्य वाटले. मतभेद चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात.
- वाय. खेमचंद सिंह, मुख्यमंत्री, मणिपूर
दोन घटना आणि संघर्षाची ठिणगी
- ७ एप्रिल २०२६ रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील त्रोंगलाओबी भागात रॉकेट किंवा बॉम्बचा संशयित हल्ला झाला; यात एक पाच वर्षांचा मुलगा आणि एक सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पहाटे कुटुंब झोपलेले असताना, हा हल्ला झाला. यात मुलांची आई जखमी झाली.
- बिष्णुपूरमध्ये झालेल्या दोन मुलांच्या हत्येप्रकरणी ‘संयुक्त कृती समिती’च्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, पीडितांच्या पालकांना सरकारी नोकरी देण्याचा विचार सरकार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.-
- १८ एप्रिल २०२६ रोजी मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील टीएम कासोमजवळ, राष्ट्रीय महामार्ग-२०२ वर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन तांगखुल नागा पुरुषांचा मृत्यू झाला; यामध्ये लष्करातील एका निवृत्त जवानाचाही समावेश होता.
- उखरूलमधील दोन व्यक्तींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी ‘युनायटेड नागा कौन्सिल’ने (यूएनसी) तीन दिवसांचा बंद पुकारला होता. या वेळी नागा स्वयंसेवकांनी लावलेला रस्ता अडथळा पोलीस हटवत असताना संघर्षाची ठिणगी पडली.
जनजीवन ठप्प
एका अधिकाऱ्याने सांगितले की, चांगौबुंग कुकी गावातील रहिवासी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये दगडफेक झाली. या गोंधळादरम्यान काही फैरी झाडण्यात आल्या. तथापि, हे कोणी केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्याने नमूद केले. ‘युनायटेड नागा कौन्सिल’ने (यूएनसी) पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमुळे राज्यातील उखरुल, कामजोंग, सेनापती, नोने आणि तामेंगलोंग यांसह नागा-बहुल असलेल्या सर्व भागांतील जनजीवन ठप्प झाले. हा बंद २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू झाला.
