दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासहित सीबीआयने ३१ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीनंतर आज मनीष सिसोदिया यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या जनाधाराला घाबरून ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा सिसोदिया यांनी केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी लढवली जाईल, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>>“केंद्राला भ्रष्टाचाराची नव्हे तर केजरीवाल यांची चिंता”, CBIच्या धाडीनंतर मनीष सिसोदियांची आगपाखड!

“या लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे यांच्याशी काही देणेघेणे नाही. अरविंद केजरीवाल यांना जनतेकडून प्रेम मिळत आहे. त्यांचा जनाधार वाढत असून यांची त्यांना काळजी आहे. केजरीवाल हे देशपातळीवर मोदी यांना पर्याय ठरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोण पर्याय असेल असे जनतेकडून विचारले जात आहे. यावेळी मी जाहीर करतो की आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी असेल, ” असे मनीष सिसोदिया म्हणाले.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

त्यांनी भाजपा तसेच नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी हे फक्त श्रीमंतांसाठीच काम करतात, असा आरोप सिसोदिया यांनी केला. “राज्यांतील विरोधी पक्षांचे राज्य उलथवून लावण्याचे षड्यंत्र रचण्यात नरेंद्र मोदी व्यग्र असतात. राज्य सरकार पाडण्यासाठी नव्हे तर देशासाठी काम करण्यासाठी त्यांना पंतप्रधान बनवण्यात आले आहे. चांगले काम करणाऱ्यांना अटक करणे हे नरेंद्र मोदी यांना शोभणारे नाही. दिल्लीचे आरोग्यमंत्री हे चांगले काम करत होते. त्यांना अटक करण्यात आली. शिक्षणमंत्री म्हणून मी चांगले काम करत आहे, पण मलादेखील अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय,” असा आरोप सिसोदिया यांनी केला.