मुंबई हल्ल्यानंतर भारताचे प्रत्युत्तर अधिक जोरदार असायला हवे होते, असा पुनरुच्चार माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या पाकिस्तान धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. सर्जिकल स्ट्राईकनेही पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. अशा ऑपरेशनचा फायदा झाला असता तर उरीनंतर पुलवामा झाला नसता, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. यासह चीनसोबतच्या तणावावर त्यांनी सरकारला घेरले.

याआधी मनीष तिवारी यांनी त्यांच्या ‘१० फ्लॅश पॉइंट्स: २० इयर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले की, तत्कालीन सरकारने केलेली कारवाई योग्य की अयोग्य हे मी म्हणत नाही. त्यावेळी भारताचा प्रतिसाद अधिक वेगवान आणि मजबूत असायला हवा होता. मुंबई हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया योग्य होती असे अनेकांचे मत आहे. लोकशाहीचे सौंदर्य हे आहे की आपण भिन्न विचार करू शकतो, असे तिवारी म्हणाले होते.

एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना, मनीष तिवारी आपल्या पुस्तकात, जेव्हा एखादा देश(पाकिस्तान) निर्दोष लोकांची कत्तल करतो आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त करत नाही. त्यावेळी संयम दाखवणं ही ताकद नसून कमकुवतपणाचं लक्षण आहे. २६/११ च्या वेळी एक अशी संधी होती की जेव्हा शब्दांपेक्षा प्रत्युत्तर देत कारवाई करणं गरजेचं होतं. तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ च्या हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होतं.

सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देत तिवारी म्हणाले की, यापूर्वीही असे प्रकार घडत आले आहेत, पण ते जाहीरपणे मान्य केले गेले नाहीत. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक केला. मात्र त्याचवेळी उदाहरणे देताना तिवारी म्हणाले की, यामुळे पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. चीनसोबतच्या संबंधांवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, सरकार खरे बोलत नाही. संसदेतही हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न झाला, पण सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत प्रतिसाद देत नाही.

चीन अनेक देशांसोबतचे सीमा विवाद सोडवत आहे, मात्र भारताबाबतची भूमिका वेगळी आणि आक्रमक असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मनीष तिवारींनी त्यांच्या पुस्तकात जनरल व्हीके सिंग यांच्या वयाच्या वादावरही मत व्यक्त केले आहे. तत्कालीन यूपीए सरकारने जनरल व्ही के सिंग यांचे वय मान्य करायला हवे होते आणि त्यांना पूर्वनिश्चित वेळेत निवृत्ती देऊन सन्मानपूर्वक सोडवता आले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.