गेल्या काही दिवसांपासून हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावर वाद सुरु आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद सुरु झाला. कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. कंगना रणौत, हेमा मालिनी, शबाना आझमी, रिचा चड्ढा यांसारख्या सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अभिनेत्री सोनम कपूर हिने याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनम कपूरने हिजाब आणि पगडीची तुलना केल्याने भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनम कपूरने केलेल्या या पोस्टवर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी जोरदार टीका केली आहे. “सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक अतिशय वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. सर्वप्रथम मी सोनम कपूरला सांगू इच्छितो की, अशा वादग्रस्त पोस्ट टाकून दोन धर्मांमध्ये भांडण लावून देण्याचे कृत्य चुकीचे आहे. तुम्ही ज्या पगडीची तुलना हिजाबशी केली आहे, ती शीखांसाठी आवश्यक आहे. गुरु गोविंद सिंग जी यांनी आम्हाला हा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते प्रत्येक शीखसाठी आवश्यक आहे. तो आमच्या शरीराचा एक भाग आहे. ते कोणतेही रत्न नाही”, असे त्यांनी सांगितले.

त्यापुढे ते म्हणाले, “त्यामुळे तुम्ही हिजाबची पगडीशी केलेली तुलना अत्यंत चुकीची आहे. सर्व धर्मांची स्वतःची अशी एक श्रद्धा असते. त्यामुळे आपण त्या समजुती श्रद्धा जपल्या पाहिजेत. पण अशाप्रकारे सोनम कपूरने जे जाणूनबुजून केले आहे. हा गैरप्रकार केला जात आहे. यामुळे लोकांना जाणूनबुजून भडकवले जात असून ते अत्यंत चुकीचे आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. मला सोनम कपूरला सांगायचे आहे की, तुझे काम कलाकार आहे आणि त्यामुळे तू तुझ्या कलाकाराचे काम कर.”

हिजाब वादावर सोनम कपूरची पोस्ट चर्चेत, पगडीशी केली तुलना

सोनम कपूर नेमकं काय म्हणाली?

सोनम कपूरने हिजाब वादावर तिचे मत मांडताना हिजाबची तुलना शीख धर्मातील लोक परिधान करत असलेल्या पगडीशी केली होती. सोनमने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यात एका बाजूला हिजाब बांधलेली महिला तर दुसऱ्या बाजूला पगडी परिधान केलेला पुरुष होता.

यातील पगडी असलेल्या फोटोवर तिने हे बांधणं निवड असू शकते, असं लिहिलं होतं. तर दुसरीकडील हिजाब बांधलेल्या फोटोवर हे बांधण्याची तुमची निवड असू शकत नाही, असं लिहिलं होते. यावर स्वतः सोनमनं कोणतीही कमेंट न करताही हिजाब बांधण्यास आपलं समर्थन दिलं होते.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असं न्यायालयाने म्हटलं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणादेखील केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjinder singh sirsa slams actress sonam kapoor for comparing turban and hijab nrp