‘फ्लायदुबई’च्या एका विमानात धक्कादायक घटना घडल्यानंतर जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. दुबईवरून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या एका विमानात सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये दुसऱ्या वैमानिकावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय वैमानिक स्मित मच्छार हे गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीत देखील स्मित मच्छार यांनी विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यामुळे मच्छार यांचं जगभरातून कौतुक होत आहे.
फ्लायदुबईच्या विमानात उद्भवलेल्या या अतिशय कठीण प्रसंगात स्मित मच्छार यांनी दाखवलेलं धैर्य, संयम आणि जबाबदारीची जाणीव व समयसूचकता, या त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी ‘मॅनकाइंड फार्मा’ने कॅप्टन स्मित मच्छार यांचा १ कोटी रुपये देऊन सन्मान करण्याची घोषणा केली आहे.
फ्लायदुबईच्या एका विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न वैमानिक स्मित मच्छार यांनी हाणून पाडला. त्यांच्यावर चाकूने हल्ला झालेला असतानाही या संकटाच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेल्या धैर्याची दखल ‘मॅनकाइंड फार्मा’ने घेतली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘मॅनकाइंड’ने एक्सवर (ट्विटर) एक निवेदन जारी करत स्मित मच्छार यांचं कौतुक केलं आहे. या संदर्भातील वृत्त बिझनेस टुडेने दिलं आहे.
१ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा
भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी स्वतःपेक्षा प्रवाशाला अधिक प्राधान्य दिलं, हेच खरं नेतृत्व आहे. कृतज्ञतेची एक भावना म्हणून ‘मॅनकाइंड फार्मा’ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी १ कोटी रुपयांचं बक्षीस देत आहे. मच्छार यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्ही आपल्या कार्याला सलाम करतो, असं ‘मॅनकाइंड’ने म्हटलं आहे.
दरम्यान, तुम्ही प्रवाशांचे वाचवलेले प्राण आणि दिलेली प्रेरणा याची तुलना पैशांनी होऊ शकत नाही. मात्र, फक्त शब्दांनी आभार न मानता कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मॅनकाइंड’ने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला १ कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. हा आमच्या आदराचा आणि कौतुकाचा एक छोटा भाग असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
‘फ्लायदुबई’च्या विमानात काय घडलं?
दुबईहून तेल अवीवच्या दिशेने या विमानाने उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असतानाच कॉकपिटमध्ये पायलट व को-पायलट यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही क्षणांत सह-वैमानिकाने वैमानिकावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मच्छार गंभीर जखमी झाले. सध्या या घटनेदरम्यानचे विमानातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादामुळे ३४ हजार फुटांवरून अवघ्या एका मिनिटात हे विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आलं, ज्यामुळे विमानावरील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. त्यानंतर अखेर हे विमान सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवण्यात आलं.
