माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी करोनावर मात केली आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रूग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. ८८ वर्षीय मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर, १९ एप्रिल रोजी एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंग यांनी करोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांनी पहिला डोस ४ मार्च रोजी तर दुसरा ३ एप्रिल रोजी देण्यात आला होता. मात्र करोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्याआधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये मनमोहन सिंग यांनी करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भातील काही सल्ले पंतप्रधानांना दिले होते. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली.

पत्रातून दिला पाच कलमी कार्यक्रम

मनमोहन सिंग यांनी पत्रातून मोदी सरकारला करोनाविरोधातील लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला देखील दिला आहे.  या पाच कलमी कार्यक्रमात, १. पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे २. राज्यांना अपेक्षित असेलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत ३. राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी. ४. लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या ५. वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या मुद्यांचा समावेश आहे.

देशातील परिस्थिती चिंताजनक

सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मागील काही दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आरोग्य व्यवस्थांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन प्लॅण्ट, ऑक्सिजन एक्सप्रेस अशा उपाययोजना करुन ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.