‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची घोषणा
नववर्षांत केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया योजनेत नवोद्योगांसाठी १६ जानेवारीला कृती आराखडा जाहीर केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वर्षांतील अखेरच्या मन की बात कार्यक्रमात सांगितले.
१५ ऑगस्टच्या भाषणात मी स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया योजनेचे सूतोवाच लाल किल्ल्यावरील भाषणात केले होते. या कार्यक्रमामुळे युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. १६ जानेवारीला या योजनेचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
गेल्या महिन्यात त्यांनी तामिळनाडूतील पूर, हवामान बदल व विशेष व्यक्तींबाबत चिंता व्यक्त केली होती व आपत्ती निवारणात सार्क देशांनी मोठी भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले होते. येत्या २६ जानेवारीला महान व्यक्तींच्या पुतळ्याचे परिसर स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी, जर देशातील १२५ कोटी लोकांनी ठरवले तर ते इतिहास घडवू शकतात .
थेट बँक हस्तांतर मोहिमेत लोकांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत आहे. आम्ही सुगम्य भारत योजना सुरू केली असून त्यात आता अपंगांसाठी पायाभूत सुविधा दिल्या जातील. त्यामुळे त्यांच्यासाठी अपंगत्व हे दिव्यांग होईल व अपंगांना पुढे विकलांग न म्हणता दिव्यांग म्हणावे. शारीरिक कमतरता असल्याने आपण त्यांच्यावर अपंगत्वाचा शिक्का मारतो, पण या लोकांना अधिक क्षमताही देवाने दिलेल्या असतात मग आपण त्यांना विकलांग का म्हणावे, असा विचार माझ्या मनात आला, त्यामुळे त्यांना दिव्यांग म्हणावे .

युवा महोत्सवाची सूचना द्या
युवा महोत्सवासाठी लोकांनी कल्पना सुचवाव्या. या महोत्सवात १० हजार युवक होतील. विकास, कौशल्ये व सुसंवादात भारतीय युवकांचे स्थान असा विषय आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी मोबाइल अ‍ॅपवर या सूचना पाठवाव्यात.

मालवीय यांची देशसेवा
दिलीप मालवीय नावाच्या गवंडी काम करणाऱ्या एका व्यक्तीने बांधकाम साहित्य दिल्यास प्रसाधनगृह बांधण्याचे पसे घेणार नाही असे जाहीर केले आहे. तो मध्य प्रदेशातील सिंहोर जिल्ह्य़ातील भोजपूर गावचा आहे व त्याने अशी शंभर स्वच्छतागृहे फुकट बांधून दिली आहेत. स्वच्छता मोहिमेच्या अशा चांगल्या बातम्या पुढे येत आहेत असे मोदींनी स्पष्ट केले.

काय आहे योजना?
’ या योजनेत कर्जाची व्यवस्थाही केली जाईल. आयआयटी, आयआयएम या प्रमुख संस्था या कार्यक्रमात जोडल्या जातील.
’देशातील बुद्धिमान युवकांना आता काही शहरांपुरते मर्यादित राहावे लागणार नाही, देशात बुद्धिमान तरुण आहेत व त्यांना संधीची गरज आहे. ती सरकार त्यांना ते आहेत तेथेच उपलब्ध करून देईल.