पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी भारतीय क्रिेकेट संघाचं कौतुक केलं. भारत-अफगाणिस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्याचा उल्लेख करताना मोदींनी, विजयानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान संघासोबत चषक घेतला होता, या निर्णयाचं विशेष कौतुक केलं. याशिवाय मोदींनी अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याचाही विशेष उल्लेख केला. राशिद खानची आयपीएलमधील कामगिरी उल्लेखनीय होती. राशिद खान म्हणजे जागति क्रिकेटला मिळालेली देण आहे, असं मोदी म्हणाले. भारतीय संघाने विजयानंतर चषक अफगाणिस्तानसोबत घेतल्याने हा सामना माझ्या नेहमीच लक्षात राहील, असं मोदी म्हणाले. यापूर्वी मोदींनी 44 व्या मन की बात कार्यक्रमातही क्रीडा क्षेत्रावर भर दिला होता.

योगमुळे जग एकवटला – 

जगभरात नुकताच साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचाही मोदींनी उल्लेख केला. जगाभरात योग दिवस उत्साहात साजरा झाला. त्या दिवशी वेगळंच दृष्य होतं, सगळं जग एकवटलेलं दिसत होतं. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि अनेक महिलांनीही योगासनं केली असं मला सांगण्यात आलं. लदाखच्या उंच शिखरावरही भारत आणि चीनच्या सैन्यांनी एकत्र येऊऩ योगाभ्यास केला. हवाईदलाच्या आमच्या जवानांनी तर जमिनीपासून 15 हजार फूट उंचीवर योगासनं करुन सर्वांना थक्क केलं. ते खरंच पाहण्यासारखं दृष्य होतं, असं मोदी म्हणाले.

जीएसटीबाबत बोलताना मोदी म्हणाले, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. देशात प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण आहे.  नरेंद्र मोदी यांनी जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली. ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. 23 जूनला श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. ते अवघ्या 33 व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु बनले होते. भारतातील औद्योगिक वाढीत श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.