Manoj Jarange Patil: कुणबी दाखले रद्द झाल्याचा दावा करत मराठा नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी, “मी जीवघेणं उपोषण करु शकतो तर, कोणाचा जीव घेण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाही”, असा गंभीर इशारा देखील दिला.

बावनकुळेंवर टीका

“मराठ्यांनीच मरणयातना भोगायच्या का? आम्ही आमच्या हक्काचं घेतलंय, ते ही रद्द करायला निघालात? मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. नोंदी रद्द करुन आमच्या बोकांडी बसण्याचा प्रयत्न करु नका. बावनकुळे मी बोकांडी बसलो तर पुन्हा उठणार नाही”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. “समाजातील मुलांसाठी प्रमाणपत्र हवीयेत. चूक सुधारली तर तुमच्यावर टीका करणार नाही”, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यावेळी सरकारला इशारा देखील दिला. “तुमच्यात किती ताकद आहे हे मला माहितीये आणि माझ्या समाजात किती ताकद आहे देखील मला माहितीये. गाडीत देखील बसू देणार नाहीत, ती वेळ येऊ देऊ नका. समाजाच्या लोकांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मी जीवघेणं उपोषण करु शकतो तर, कोणाचा जीव घेण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाही. मला त्या रस्त्यावर उतरवू नका”, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

“बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. जरांगे पाटलांच्या वक्तव्यांमध्ये तथ्य नाही”, अशा आशयाचे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी हे पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे.

युतीमधील नेते काय म्हणाले?

मंत्री उदय सांमत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, “मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा बावनकुळे असतील ते मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. गैरसमजातून काही गोष्टी निर्माण झाल्या असतील त्या दूर करण्यास आम्ही तयार आहोत. एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आता मुख्यमंत्री फडणवीस त्याच भूमिकेत आहेत”, असे सामंत म्हणाले. यावेळी त्यांनी वैयक्तिक पातळी टीका न करण्याचे आणि चर्चा करण्याचे आवाहन केले.

प्रविण दरेकरांनी जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, “त्यांनी दोन्ही गोष्टी करु नये, जीव घेऊ नये आणि देऊही नये”. कारण “जीव घेतल्यास तो गुन्हा होऊल आणि दिल्यास आम्हाला, महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला त्यांची गरज आहे”, असे दरेकर म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निधीवरुन प्रश्न उपस्थित केला. ५२ टक्के असणाऱ्या ओबीसींसाठी ५०० कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १२ हजार कोटी? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला.