देशात सध्या करोना प्रतिबंधक मोहिमेने चांगलाच वेग घेतल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर दस्तक योजनेच्या अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरही लसीकरण केलं जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी थेट शेतात जाऊन तिथे काम करणाऱ्या महिलांचं लसीकरण केलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ह्या फोटोत एक महिला आरोग्य कर्मचारी शेतात काम करणाऱ्या महिलेला लस टोचताना दिसत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या अलवार भागातला असल्याचं मांडविय यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

करोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने हर घर दस्तक अभियान राबवलं आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. या अभियानांतर्गत गेल्या महिन्यात नवी मुंबईतल्या वाशी आणि नेरुळ रेल्वे स्थानकावर लसीकरण केंद्र उभारुन तिथे लस देण्याचं काम सुरू होतं. रेल्वे स्थानकासोबतच जम्बो कोविड सेंटर, नागरी आरोग्य केंद्रे, मॉल्स, एपीएमसी मार्केट इथंही लसीकरण केंद्रे उभारुन लसीकरण केलं जात होतं.